सावंतवाडी : कला, संस्कृती आणि शिक्षणाच्या समृद्ध परंपरेला संघटित व्यासपीठ देत सावंतवाडीच्या सांस्कृतिक विश्वात एका नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. ‘सम्राट क्लब सावंतवाडी टाउन’ या नव्या क्लबचा स्थापना व पदग्रहण सोहळा रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता राणी पार्वती हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
सम्राट क्लब इंटरनॅशनलशी संलग्न असलेल्या सम्राट क्लब मयेच्या मार्गदर्शनाखाली या नव्या क्लबची स्थापना होत असून चार्टर्ड प्रेसिडेंट सम्राट नरेंद्र देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली क्लबच्या कार्याचा श्रीगणेशा होणार आहे, अशी माहिती सम्राट क्लब मयेचे अध्यक्ष सम्राट नरेश पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्यांनी सांगितले की, ‘सम्राट क्लब सावंतवाडी टाउन’च्या चार्टर्ड प्रेसिडेंटपदी सम्राट नरेंद्र देशपांडे, तर भावी अध्यक्षपदी सम्राट हरिश्चंद्र पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी सम्राट पृथ्वीराज प्रताप, सचिवपदी सम्राट प्रतिभा चव्हाण, खजिनदारपदी सम्राट सुनील राऊळ, तर संचालकपदी सम्राट सौ . स्मिता केंकरे, सम्राट डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, सम्राट डॉ. सोनल लेले आणि सम्राट गुरुप्रसाद चिटणीस यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच जनसंपर्क अधिकारी म्हणून सम्राट दादा मडकईकर, ऑडिटर म्हणून सम्राट कौस्तुभ पेडणेकर, प्रोग्राम डायरेक्टर म्हणून सम्राट ॲड. सिद्धी परब यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
स्थानिक कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!
कला, संस्कृती आणि शिक्षण या तीन प्रमुख क्षेत्रांना केंद्रस्थानी ठेवून क्लबच्या माध्यमातून विविध विधायक आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा मानस आहे. स्थानिक कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, सावंतवाडीच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे आणि शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक योगदान देणे, या उद्दिष्टांसाठी क्लब कार्यरत राहणार आहे.
सावंतवाडीच्या भूमीत विविध कला आणि सांस्कृतिक क्षेत्रांत कार्यरत असलेल्या प्रतिभावंतांना एकत्र आणत त्यांच्या कलेला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. त्यामुळे ‘सम्राट क्लब सावंतवाडी टाउन’ ही केवळ क्लबची स्थापना न राहता सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक चळवळीचे प्रभावी केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करणार, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
मान्यवरांची लाभणार उपस्थिती
या स्थापना व पदग्रहण सोहळ्यास सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रांत सावंत विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच सम्राट धर्मा व्ही. चोडणकर, इन्स्टॉलेशन ऑफिसर तथा डायरेक्टर क्लब एक्स्टेंशन, सम्राट क्लब इंटरनॅशनल आणि सम्राट शशिकांत पुनाजी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
‘सम्राट’ परिवाराने केले उपस्थितीचे आवाहन –
‘सम्राट क्लब सावंतवाडी टाउन’च्या स्थापनेमुळे सावंतवाडीच्या कला, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्राला एकसंघ, सकारात्मक आणि विधायक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत विधायक उपक्रम पोहोचवून सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या नव्या क्लबच्या स्थापना सोहळ्यास सम्राट परिवारातील सर्व कलाकार, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या क्लबच्या वाटचालीस शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन सम्राट क्लब मयेचे अध्यक्ष सम्राट नरेश पेडणेकर यांनी केले.
यावेळी माजी अध्यक्ष सम्राट अर्जुन नाईक, सम्राट नरेंद्र देशपांडे, सम्राट हरिश्चंद्र पवार, सम्राट गुरुप्रसाद चिटणीस आदी उपस्थित होते.
कला फुलविण्याचा संकल्प… संस्कृती जपण्याचा ध्यास… आणि शिक्षणाला बळ देण्याची उमेद घेऊन ‘सम्राट क्लब सावंतवाडी टाउन’च्या रूपाने सावंतवाडीच्या सांस्कृतिक क्षितिजावर नव्या पर्वाचा उदय होत आहे.



