ओरोस: अल्पवयीन मुलीला फोन करून व्हॉट्सॲपवर संदेश पाठवणे, प्रेमाची मागणी करणे, नकार दिल्यानंतर धमकी देणे तसेच तिचा वारंवार पाठलाग करून त्रास दिल्याच्या आरोपांप्रकरणी समीर मनोहर जाधव (रा. मालवण) यांची मे. विशेष सत्र न्यायालय, ओरोस यांनी सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणी निवती पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३/२०२२ अन्वये भारतीय दंड विधान कलम ३५४-ड (१), ५०७ तसेच पोक्सो अधिनियम कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सरकारी पक्षाच्या आरोपानुसार, आरोपीने मोबाईल फोन तसेच व्हॉट्सॲपच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीशी संपर्क साधला होता. त्याने फोन करून प्रेमाची मागणी केल्याचा तसेच मुलीने नकार दिल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना व्हॉट्सअॅप चॅटिंग दाखविण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतरही फोन व संदेशांच्या माध्यमातून त्रास देत तिचा पाठलाग केल्याचे सरकारी पक्षाचे म्हणणे होते.
या खटल्यात सरकारी पक्षाने एकूण सात साक्षीदार तपासले. मात्र, बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करताना ॲड.अशपाक शेख यांनी कथित व्हॉट्सॲप चॅटिंगबाबत आवश्यक व कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य पुरावा न्यायालयासमोर सिद्ध झालेला नसल्याचा महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला.
तसेच गुन्हा दाखल करण्यास झालेला विलंब, आरोपीने वारंवार पाठलाग केल्याचा आरोप आणि धमकी दिल्याची बाब ही उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संशयाच्या पलीकडे सिद्ध होत नसल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद, साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध कागदोपत्री पुराव्यांचा सखोल विचार केल्यानंतर मे. विशेष न्यायाधीश श्री. एस. टी. त्रिपाठी, ओरोस यांनी २ सप्टेंबर २०२६ रोजी निकाल दिला. न्यायालयाने आरोपी समीर मनोहर जाधव यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.
आरोपीच्या वतीने ॲड. अशपाक शेख यांनी मुख्य काम पाहिले. त्यांना ॲड. नामदेव मठकर, ॲड. पंकज खरवडे, ॲड. विनय रजपूत, ॲड. कैस शेख, ॲड. भूषण कदम आणि ॲड. हरेश वरवडेकर यांनी सहकार्य केले.



