सावंतवाडीत भाजपचा ‘महासंकल्प’! ; ९ सप्टेंबरला जिल्हा कार्यकारणीचा महामेळावा अन् विस्तार. ;प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आ. प्रमोद जठार राहणार उपस्थित.

सावंतवाडी :आगामी राजकीय रणधुमाळीची चाहूल आणि संघटनात्मक ताकदीचे दर्शन घडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सावंतवाडीत शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात ९ सप्टेंबर रोजी भाजपची विस्तारित जिल्हा कार्यकारणी बैठक रंगणार असून, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह प्रमुख नेते व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तब्बल ४०० हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यकारणीत सहभागी होणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रदेश कार्यकारणीची बैठक नुकतीच पुणे येथे पार पडली. या बैठकीला चार हजारांहून अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. त्याच धर्तीवर सिंधुदुर्गातही कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने सावंतवाडीतील विस्तारित जिल्हा कार्यकारणीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रमोद जठार, तसेच अतुल काळसेकर यांच्यासह जिल्हा कार्यकारणी सदस्य, मंडळ कार्यकारणी पदाधिकारी आणि विविध जनप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

विकासकामांवर अभिनंदनाचा ठराव; राजकीय प्रस्तावाकडे लक्ष –

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेल्या विविध विकासकामांची दखल घेत अभिनंदनाचा ठराव या कार्यकारणीत मांडला जाणार आहे. त्यानंतर आगामी राजकीय वाटचालीला दिशा देणारा राजकीय प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.

‘सेवा संकल्प अभियान’चेही होणार नियोजन –

मुख्यमंत्री ते पंतप्रधान अशी २५ वर्षांची यशस्वी राजकीय कारकीर्द पूर्ण केल्याबद्दल महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे नियोजनही विस्तारित जिल्हा कार्यकारणी बैठकीत करण्यात येणार आहे. १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

दरम्यान, पत्रकार परिषदेला महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, सहकार आघाडीचे जिल्हा संयोजक रवि मडगावकर, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, तालुका मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, वेंगुर्ले तालुका मंडल अध्यक्ष पप्पू परब, शहर मंडल अध्यक्ष तथा नगरपंचायत सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, माजी सभापती पंकज पेडणेकर, पंचायत समिती सदस्य महेश धुरी, दिलीप भालेकर, सागर ढोकरे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

सावंतवाडीत होणाऱ्या या विस्तारित जिल्हा कार्यकारणीमुळे भाजपच्या संघटनात्मक ताकदीचे दर्शन तर घडणारच आहे; मात्र आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीतून कोणते नवे राजकीय संकेत मिळतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles