सावंतवाडी : गणरायाच्या आगमनाने अवघा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघत असतानाच, शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सामाजिक बांधिलकीला यंदाही नवी किनार दिली आहे. जिल्हा परिषद मतदारसंघातील घराघरात गणेशपूजा साहित्य, विघ्नहर्त्या गणरायाचे कॅलेंडर आणि पिशवी पोहोचविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार डॉ. निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला.
गणेशोत्सव म्हणजे केवळ पूजा-अर्चा आणि उत्सव नव्हे, तर माणसामाणसांतील नात्यांना नव्याने उजाळा देणारा आणि समाजाला एकत्र बांधणारा उत्सव, या भावनेतून दिनेश गावडे यांच्याकडून हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. त्यामुळे गणरायाच्या आगमनासोबतच गावागावांत आणि घराघरांत आपुलकीचा संवाद साधण्याचा हा उपक्रम यंदाही सुरू झाला आहे.
गणेशपूजेच्या साहित्यापासून ते गणरायाच्या सुंदर कॅलेंडरपर्यंत प्रत्येक घराच्या उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचे वाटप करून गावडे यांनी ‘उत्सव भक्तीचा अन् नातं माणुसकीचं’ अशी भावना जपली आहे. गणेशभक्तांच्या आनंदात सहभागी होत त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न सामाजिक उपक्रमासोबतच जनसंपर्काचे प्रभावी माध्यम ठरताना दिसत आहे.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला यंदाही मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली असून, मतदारसंघातील विविध गावांमध्ये गणेशपूजा साहित्य, कॅलेंडर आणि पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. गणरायाच्या सेवेतून जनतेशी संवाद आणि जनतेशी नात्यातून सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.
या शुभारंभप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर, निता राणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्त उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरू झालेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत असून, गणरायाच्या आगमनाबरोबरच दिनेश गावडेंच्या जनसंपर्काचाही ‘श्रीगणेशा’ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. भक्ती, सामाजिक बांधिलकी आणि जनसंपर्क यांचा सुरेख संगम साधणारा हा उपक्रम यंदाच्या गणेशोत्सवात लक्षवेधी ठरत आहे.



