सावंतवाडी : कोकण आणि मराठवाड्याला थेट जोडणाऱ्या सावंतवाडी–नांदेड विशेष एक्स्प्रेसला (गाडी क्र. ०७६६०) प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. येत्या १४ व १७ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या फेऱ्यांचे आरक्षण सुरू असूनही मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहेत. या विशेष सेवेचा प्रतिसाद समाधानकारक न राहिल्यास भविष्यात कोकण – मराठवाडा थेट रेल्वेसेवेच्या मागणीला फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या रेल्वेमुळे कोकणातील सावंतवाडी, रत्नागिरी व चिपळूण परिसराला पुण्यासह मराठवाड्यातील महत्त्वाच्या शहरांशी थेट संपर्क मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी पुणे व लातूर ही शैक्षणिक केंद्रे, तर भाविकांसाठी तुळजापूर, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, माहूर आणि नांदेड यांसारखी प्रमुख तीर्थक्षेत्रे या मार्गाने जोडली जात आहेत.
पुणे हे शिक्षण व रोजगाराचे प्रमुख केंद्र असून धाराशिवमार्गे तुळजापूर, परळी वैजनाथमार्गे ज्योतिर्लिंग व अंबाजोगाई, परभणीमार्गे औंढा नागनाथ आणि नांदेडमार्गे सचखंड गुरुद्वारा व माहूरला जाणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटनासोबतच शिक्षण, व्यवसाय आणि पर्यटनाच्या दृष्टीनेही ही सेवा महत्त्वाची मानली जात आहे.
कायमस्वरूपी सेवेसाठी प्रतिसाद महत्त्वाचा –
कोकण–मराठवाडा थेट रेल्वेसाठी दोन्ही भागांतील नागरिक, प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी अनेक वर्षे पाठपुरावा केला आहे. त्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर ही विशेष रेल्वेसेवा उपलब्ध झाली आहे. रेल्वेसेवेच्या भवितव्यासाठी प्रवासी प्रतिसाद हा महत्त्वाचा घटक ठरणार असल्याने या फेऱ्यांमध्ये समाधानकारक प्रवासी संख्या दिसणे आवश्यक असल्याचे रेल्वे अभ्यासकांचे मत आहे.
१४ व १७ सप्टेंबरच्या फेऱ्यांचे आरक्षण सुरू असून प्रवाशांनी या सेवेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवासी संघटनांकडून करण्यात आले आहे. कोकण आणि मराठवाड्यातील थेट रेल्वे जोडणी अधिक मजबूत करण्यासाठी या विशेष गाडीला मिळणारा प्रतिसाद निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.



