खड्डे, पाणी आणि झाडीच्या विळख्यातील रस्त्यांना अखेर ‘पावसाळी डांबरा’चा आधार! ; अक्षय पार्सेकर यांची गणेश चतुर्थीपूर्वी रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याची मागणी यशस्वी.

सावंतवाडी : गणेशोत्सवासाठी चाकरमानी आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने गावाकडे परतण्याच्या पार्श्वभूमीवर निरवडे–आरोस तिठा–न्हावेली–विवरवाडी–दांडेली–कोंडूरा–तळवणे–आरोंदा या प्रमुख मार्गावरील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. विवरवाडी येथे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी रस्त्यावर साचत असल्याने वाहनधारकांना अक्षरशः कसरत करावी लागत होती. त्यातच दांडेली, कोंडूरा आणि तळवणे परिसरात ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे आणि रस्त्यालगत वाढलेली झाडी यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता.

या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत न्हावेलीचे माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता पूजा इंगवले तसेच उपअभियंता पाटील यांच्याशी चर्चा करून गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती पूर्ण करण्याची ठाम मागणी केली होती.

पार्सेकर यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत रस्त्याची पाहणी केली. यावेळी खड्डे, रस्त्यावर साचणारे पाणी आणि रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी यांची पाहणी करण्यात आली होती.

रस्त्यावर पाणी साचणाऱ्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करणे, धोकादायक खड्डे बुजविणे तसेच रस्त्यालगतची झाडी हटवून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या. त्यानंतर रस्त्यालगतची झाडी मारून साफसफाईचे काम पूर्ण करण्यात आले.

🛣️ काँक्रिटीकरण टिकले नाही; ‘पावसाळी डांबरा’चा पर्याय ठरला उपयोगी

दरम्यान, आरोस रस्त्यावरील खड्डे यापूर्वी काँक्रिटीकरण करून बुजविण्यात आले होते. मात्र अवघ्या दोन दिवसांतच रस्त्याची अवस्था पुन्हा ‘जैसे थे’ झाल्याने या कामाच्या टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

यामुळे न्हावेलीचे माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. पवार यांच्याकडे रस्त्यावरील खड्डे पावसाळी डांबराच्या माध्यमातून बुजविण्याची मागणी केली होती.

या मागणीचीही तातडीने दखल घेत अधिकारी पवार यांनी पावसाळी डांबर उपलब्ध करून देत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करून दिले. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

झाडी हटली; आता रस्तेही सुस्थितीत येण्याची अपेक्षा –

गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे, साचणारे पाणी आणि वाढलेली झाडी यांचा प्रश्न केवळ गैरसोयीपुरता मर्यादित नसून सुरक्षित वाहतुकीशीही निगडित आहे. त्यामुळे उर्वरित आवश्यक कामेही गणपतीपूर्वी पूर्ण करून रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत करावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

यावेळी न्हावेलीचे माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर, अक्षय नाईक, राज धवण, रुपेश मोरजकर, कुलदीप नार्वेकर आणि प्रज्योत मालवणकर उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी गावागावांत लगबग सुरू असताना, रस्त्यांच्या दुरुस्तीला मिळालेली ही गती वाहनधारकांसाठी दिलासादायक ठरत आहे. आता पाहणीपुरतीच नव्हे, तर प्रत्यक्ष कामेही वेळेत पूर्ण होऊन रस्त्यांचा प्रवास खड्डेमुक्त आणि सुरक्षित व्हावा, एवढीच नागरिकांची अपेक्षा!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles