सिंधुदुर्ग : गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्ग जिल्ह्याला अक्षरशः हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. शिरोडा येथील माजी पंचायत समिती उपसभापती सिद्धेश परब यांच्या घराच्या आवारातील एका मांगरावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत गांजा सदृश्य पदार्थ आणि कोकेन सदृश्य पावडर आढळल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक आज सकाळी सिद्धेश परब यांच्या घरी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण घराची झडती घेतली. मात्र, घरामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर घराच्या आवारातील दोन-तीन मांगरांचीही पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. सुरुवातीच्या तपासणीतही काही आक्षेपार्ह आढळले नसल्याची माहिती आहे.
मात्र, त्यानंतर झालेल्या हालचालींनंतर एका मांगरातील टेबलखाली ठेवलेली एक संशयास्पद बॅग पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगण्यात येते. या बॅगेत सुमारे ५०४ ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ, तसेच एका सिगारेटच्या पाकिटात कोकेन सदृश्य पावडर आढळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या प्रश्नाला पुन्हा एकदा ऐरणीवर आणले आहे. विशेष म्हणजे, सामाजिक कार्यात सक्रिय असलेले आणि विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे सिद्धेश परब यांच्या घराच्या आवारातच अशा प्रकारचे पदार्थ आढळल्याने या संपूर्ण प्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
“सिद्धेशला ओळखणाऱ्यांना धक्काच”
सिद्धेश परब हे सामाजिक प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडणारे कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी तसेच आजगावसह आठ गावांमध्ये प्रस्तावित मायनिंगविरोधातील आंदोलनात ते सक्रिय असल्याचा उल्लेख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.
“सिद्धेशला ओळखणाऱ्या व्यक्तींना या घटनेवर सहज विश्वास बसणार नाही. त्यांच्या घराच्या आवारातील मांगरात अमली पदार्थ सदृश्य पदार्थ आढळणे हे अत्यंत धक्कादायक आणि संशय निर्माण करणारे आहे,” अशी भूमिका डॉ. परुळेकर यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात अमली पदार्थांचा वाढता विळखा, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात आढळणारे संशयास्पद पदार्थ आणि त्याविरोधात सुरू असलेल्या पोलिसांच्या कारवाया या पार्श्वभूमीवर या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. मात्र, सामाजिक कार्यकर्त्याच्या घराच्या आवारातील मांगरातच असा कथित साठा आढळल्याने प्रकरणाभोवती संशयाचे वलय निर्माण झाले आहे.
“आता कार्यकर्त्यांनी घर-मांगरांबाबतही सतर्क राहावे!”
शक्तीपीठ महामार्ग, आजगाव मायनिंग तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इको सेन्सिटिव्ह एरियासंदर्भात भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे डॉ. परुळेकर यांनी म्हटले आहे.
“कोणाच्या घरात, आवारात किंवा मांगरात कधी काय आढळेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरावर लक्ष ठेवणे, शक्य असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि अनोळखी व्यक्तींच्या हालचालींबाबत सावध राहणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणेकडून सुरू असून, सापडलेले पदार्थ नेमके कोणते आहेत, ते तेथे कसे आले आणि त्यामागे नेमके कोण आहे, याचा उलगडा तपासातूनच होणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील सत्य नेमके काय, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
न्यायालयीन प्रक्रियेतून सत्य समोर येईल आणि योग्य तो न्याय मिळेल, असा विश्वास असल्याचे डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले आहे.



