सावंतवाडी : संगीताच्या सुरांना मेहनतीची साथ लाभली की यशाची नवी मैफल सजते, याचा प्रत्यय श्री पंचम खेमराज महाविद्यालय (स्वायत्त), सावंतवाडी येथील विद्यार्थी मंगेश रामचंद्र मेस्त्री याने आपल्या उल्लेखनीय कामगिरीतून दिला आहे. मुंबई विद्यापीठ आयोजित ५९व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत स्वरवाद्य—हार्मोनियम वादन या प्रकारात मंगेशने कांस्यपदक पटकावत महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारत मंगेशने आपल्या सुरेल सादरीकरणातून परीक्षकांची दाद मिळवली. हार्मोनियमच्या काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांवरून उमटलेल्या सुरांनी त्याच्या साधनेची, कलात्मकतेची आणि सातत्यपूर्ण मेहनतीची प्रभावी साक्ष दिली. अंतिम फेरीत कांस्यपदक मिळवत त्याने आपल्या प्रतिभेची मोहोर उमटवली.
मंगेशच्या या यशामुळे सावंतवाडीच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या कलाक्षेत्रातील गुणवत्तेची पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोंसले, नियामक मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, संचालक प्रा. डी. टी. देसाई, सहाय्यक संचालक अॅड. शामराव सावंत तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी मंगेशचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मंगेशच्या यशामागे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीचे समन्वयक डॉ. एस. एम. बुवा यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. डी. जी. बोर्डे, डॉ. एस. ए. देशमुख, प्रा. राहुल शेवाळे, डॉ. वाय. ए. पवार, प्रा. सौ. हर्षदा परब आणि निकिता वर्दम यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
सुरांची साधना ठरली यशाची गुरुकिल्ली!
कला ही केवळ छंद नसतो, तर सातत्यपूर्ण साधना, शिस्त आणि समर्पणातून ती व्यक्तिमत्त्वाला आकार देते. मंगेशने हार्मोनियमच्या सुरांशी साधलेले नाते आणि त्यासाठी घेतलेली मेहनत अखेर मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीतील कांस्यपदकाच्या रूपाने सार्थकी लागली आहे.
युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत कांस्यपदक पटकावून मंगेशने केवळ स्वतःचे नाव उज्ज्वल केले नाही, तर श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सांस्कृतिक वैभवातही आणखी एक अभिमानाचा अध्याय जोडला आहे.



