वाचन, लेखन अन् संवादातून हिंदीवर प्रभुत्व मिळवा! : प्रा. सुनील शेट यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. ; रोझरी माध्यमिक विद्यालय कुजिरा-बांबोळी येथे हिंदी दिवस उत्साहात संपन्न.

कुजिरा-बांबोळी: शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी हिंदी भाषा आत्मसात करण्यासाठी वाचन, लेखन आणि प्रभावी बोलण्याची सवय नियमितपणे अंगीकारली, तर भाषेवर सहज प्रभुत्व मिळविता येते. सातत्यपूर्ण सरावातून विद्यार्थी हिंदी भाषेत निपुण होऊ शकतो, असे प्रतिपादन प्रा. सुनील शेट यांनी केले.

कुजिरा-बांबोळी येथील रोझरी माध्यमिक विद्यालयात २६ रोजी सकाळी ११ वाजता हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून प्रा. शेट यांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्त्व आणि दैनंदिन जीवनातील तिच्या वापराबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दीप विहार उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा. सुनील शेट, रोझरी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एलीस जोअन गोईश, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मार्था पिंटो, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. बेग, हिंदी शिक्षक हरुण मुल्ला, रविना मालवणकर, विनिका हरमलकर व शिवानंद मामलेकर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ!

हिंदी दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी संवाद सादरीकरण, वक्तृत्व, नाटिका आणि नृत्य अशा विविध उपक्रमांतून आपल्या कलागुणांचे मनमोहक दर्शन घडविले. विद्यार्थीनी मैत्री भट हिने हिंदी भाषेचे महत्त्व प्रभावीपणे विशद केले.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रा. सुनील शेट यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

यावेळी हिंदी शिक्षक हरुण मुल्ला यांनी प्रमुख पाहुणे प्रा. सुनील शेट यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

विद्यार्थ्यांनी रंगवला हिंदीचा उत्सव –

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी श्रीनिक मळीक व युविका देसाई यांनी केले. कुमार आरुष वर्दे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर आदिती आजगांवकर यांनी आभार प्रदर्शन केले.

भाषा केवळ अभ्यासाचा विषय नसून विचार व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे. वाचनातून शब्दसंपदा, लेखनातून अभिव्यक्ती आणि संवादातून आत्मविश्वास वाढतो, हा संदेश हिंदी दिवसाच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles