सावंतवाडी : महिला प्रवाशांना दिलेली अर्ध्या तिकीटाची सवलत प्रत्यक्ष प्रवासात मात्र तांत्रिक अडचणींच्या गर्तेत अडकली आहे. एनसीएमसी कार्डमध्ये पुरेशी रक्कम असूनही एसटी महामंडळाचा सर्व्हर डाऊन असल्याने कार्ड स्वीकारले जात नाही आणि महिलांकडून चक्क फुल तिकीटाचे पैसे आकारले जात आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, एसटी प्रशासनाने तातडीने योग्य पर्याय उपलब्ध करून सवलतीचा लाभ द्यावा, अन्यथा आगारप्रमुखांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे युवा सेना तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांनी दिला आहे.
सवलतीच्या योजनेला तांत्रिक अडथळ्यांचा विळखा –
एसटी महामंडळाने महिलांसाठी विशेष बस प्रवास योजना सुरू करून राज्यभर कुठेही प्रवास करताना तिकिटात ५० टक्के सवलत दिली आहे. या योजनेमुळे दररोज प्रवास करणाऱ्या महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळत होता. मात्र, ही सवलत पुढेही सुरळीतपणे सुरू राहावी, या उद्देशाने योजनेत बदल करून महिलांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले.
महामंडळाच्या या निर्णयानंतर बहुतांश महिला प्रवाशांनी एनसीएमसी कार्ड काढले असून, त्यामध्ये आवश्यक रक्कमही जमा केली आहे. मात्र, प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी महामंडळाचा सर्व्हर डाऊन असल्याने कार्ड व्यवस्थित कार्यरत होत नाही. परिणामी, सवलतीचा लाभ मिळण्याऐवजी महिला प्रवाशांकडून पूर्ण तिकीट आकारले जात आहे.
‘कार्डमध्ये पैसे असूनही सवलत नाही; मग योजनेचा उपयोग काय?’
एनसीएमसी कार्डमध्ये पैसे राखीव ठेवूनही तांत्रिक बिघाडामुळे महिलांना पूर्ण तिकीट घ्यावे लागत असेल, तर अर्ध्या तिकीटाच्या योजनेचा उपयोग काय, असा सवाल आशिष सुभेदार यांनी उपस्थित केला आहे. एका बाजूला महिलांना सवलतीचे आश्वासन दिले जाते, तर दुसऱ्या बाजूला सर्व्हरच्या बिघाडामुळे त्यांच्याकडून पूर्ण भाडे वसूल केले जाते. हा प्रकार म्हणजे महिलांची उघडपणे फसवणूक असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“महिलांनी विश्वासाने एनसीएमसी कार्ड काढले, त्यात पैसे जमा केले; मात्र एसटीच्या तांत्रिक त्रुटींचा फटका त्यांनाच बसत आहे. सर्व्हर डाऊन असल्याचे कारण देऊन महिलांकडून फुल तिकीट आकारणे अन्यायकारक आहे. प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करून महिलांना त्यांच्या हक्काची सवलत द्यावी,” अशी मागणी सुभेदार यांनी केली.
आठ दिवसांची मुदत, अन्यथा आंदोलनाचा इशारा!
एसटी महामंडळाने येत्या आठ दिवसांत सर्व्हरमधील तांत्रिक अडचणी दूर करून एनसीएमसी कार्ड सेवा सुरळीत करावी. तसेच, ज्या महिला प्रवाशांकडून चुकीने पूर्ण तिकीट आकारण्यात आले आहे, त्यांना सवलतीची रक्कम परत देण्यासाठी योग्य यंत्रणा उभी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या कालावधीत प्रशासनाने ठोस सुधारणा न केल्यास आगारप्रमुखांना घेराव घालून जाब विचारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवा सेनेचे तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांनी दिला आहे.
महिला प्रवाशांच्या नाराजीला प्रशासन जबाबदार !
महिलांसाठी सुरू करण्यात आलेली अर्ध्या तिकीटाची योजना ही केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष प्रवासातही प्रभावीपणे लागू झाली पाहिजे. तांत्रिक अडचणींचे कारण देऊन महिलांना त्यांच्या हक्काच्या सवलतीपासून वंचित ठेवणे योग्य नाही. त्यामुळे एसटी प्रशासनाने तातडीने सर्व्हरची दुरुस्ती करून महिला प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.



