सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाने सप्टेंबर महिन्यात सेवा अभियान राबविण्यात आले. यावेळी मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. त्याच उपक्रमशीलतेचा पुढील टप्पा म्हणून विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त १७ महाआरोग्य शिबिरे आणि लोक सहभागातून ५० पेक्षा अधिक कच्चे बंधारे उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
वाढदिवस म्हटला की शुभेच्छांचा वर्षाव, सत्कार, बुके आणि पोस्टरची झगमगाटी सजावट… मात्र या पारंपरिक चौकटीला छेद देत ‘ना बुके, ना पोस्टर; बळीराजाच्या सक्षमीकरणासाठी योगदान!’ असा संदेश देत भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आरोग्यसेवा आणि जलसंधारणाला प्राधान्य देणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

२ ऑक्टोबरपासून ‘जलसंधारण’ अभियानाला प्रारंभ!
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबरपासून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात कच्चे बंधारे उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. पावसाचे पाणी वाहून न जाता ते स्थानिक पातळीवर अडविणे, भूजलपातळी टिकविणे आणि शेतीसाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याच्या उद्देशाने ५० पेक्षा अधिक कच्चे बंधारे उभारण्याचे नियोजन आहे.
या उपक्रमात भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह स्थानिक युवक आणि सेवाभावी संस्थांचाही सहभाग राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला तरी अल्पावधीत पाणी वाहून जाण्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. त्यामुळे स्थानिक पातळीवरील जलसंधारणाच्या कामांना विशेष महत्त्व आहे.
आरोग्यसेवेचा ‘महासंकल्प’- ११ ते १६ ऑक्टोबरदरम्यान महाआरोग्य शिबिरे!
जलसंधारणाबरोबरच ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी ११ ते १६ ऑक्टोबरदरम्यान तीन शहरे आणि विविध जिल्हा परिषद मतदारसंघांत १७ महाआरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांची विविध आरोग्य तपासणी, आवश्यक वैद्यकीय सल्ला आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांसाठी तज्ज्ञ वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही शिबिरे महत्त्वाची ठरणार आहेत.
*मळेवाडपासून तळवडेपर्यंत आरोग्यसेवेचा ‘सेवा-सप्ताह’!*
११ ऑक्टोबरला मळेवाड येथील सुदर्शन हॉलमध्ये सकाळी १० वाजता महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून कै. सदाशिव सखाराम सेवाभावी ट्रस्ट, मळेवाड हा आयोजक आहे. रेडी, मळेवाड आणि आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे. उद्घाटक म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थित राहणार आहेत.
१२ ऑक्टोबरला बांदा येथील आनंदी मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता शिबिर होणार असून कोकण संस्था, मुंबई आयोजक आहे. महिला भाजपा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
याच दिवशी आंबोली येथे सायंकाळी ६ वाजता युनियन इंग्लिश स्कूलमध्ये पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शिबिर होणार असून भाजपा ज्येष्ठ मार्गदर्शक विनोद राऊळ उद्घाटन करणार आहेत.
१३ ऑक्टोबरला वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात सकाळी १० वाजता वेताळ प्रतिष्ठान आणि इनरव्हील क्लब, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उभादांडा, तुळस, आडेली जिल्हा परिषद मतदारसंघ तसेच वेंगुर्ला शहरातील नागरिकांसाठी हे शिबिर होणार असून आमदार प्रमोद जठार उद्घाटन करणार आहेत.
१४ ऑक्टोबरला दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात सकाळी १० वाजता सिद्धिविनायक स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित, कोलझर यांच्या वतीने शिबिर होणार आहे. दोडामार्ग शहरासह मणेरी, साटेली-भेडशी आणि माटणे परिसरातील नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर उद्घाटक असतील.
१५ ऑक्टोबरला सावंतवाडीतील आर.पी.डी. हायस्कूलमध्ये सकाळी १० वाजता सह्याद्री फाउंडेशन सावंतवाडी यांच्या वतीने महाआरोग्य शिबिर होणार आहे. कोलगाव, माडखोल, माजगाव, इन्सुली तसेच सावंतवाडी शहरातील नागरिकांसाठी आयोजित या शिबिराचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
१६ ऑक्टोबरला म्हापण येथील आदिमाया सभागृहात सकाळी १० वाजता उत्साही मित्र मंडळाच्या वतीने शिबिर होणार आहे. म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांसाठी आयोजित या शिबिराचे उद्घाटन वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजन गिरप करणार आहेत.
याच दिवशी सायंकाळी ६ वाजता तळवडे ग्रामपंचायत हॉलमध्ये मराठा समाज ऐक्यवर्धक मंडळ, तळवडे यांच्या वतीने शिबिर होणार असून तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांना त्याचा लाभ घेता येणार आहे. सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर उद्घाटन करणार आहेत.
‘वाढदिवस’ नाही, तर ‘सेवेचा उत्सव’!
वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळून त्याच माध्यमातून समाजातील गरजू घटकांसाठी काहीतरी विधायक काम उभे करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. ‘बुकेऐवजी बंधारा आणि पोस्टरऐवजी आरोग्यसेवा’ या संकल्पनेतून शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
आरोग्य आणि पाणी हे ग्रामीण जीवनातील दोन मूलभूत प्रश्न. त्यामुळे एका बाजूला नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारी महाआरोग्य शिबिरे, तर दुसऱ्या बाजूला भविष्यातील पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी कच्चे बंधारे—अशा दुहेरी उपक्रमातून वाढदिवसाचे निमित्त समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छांचा हार नको; बळीराजाच्या शिवारात पाण्याचा साठा हवा!
सत्काराचा बुके नको; गरजूंच्या चेहऱ्यावर आरोग्याचे समाधान हवे!
याच भावनेतून ‘ना बुके, ना पोस्टर—बळीराजाच्या सक्षमीकरणासाठी योगदान!’ हा संदेश सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात देण्यात येत असून, प्रस्तावित उपक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि त्यातून निर्माण होणारा सामाजिक परिणाम आगामी काळात महत्त्वाचा ठरणार आहे. यावेळी सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गावंडळकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, वेंगुर्ला मंडल अध्यक्ष पप्पू परब, माडखोल जि. प. सदस्या सौ. शिवानी नाईक.
युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र शेटकर, आंबोली युवा मोर्चा अध्यक्ष विग्नेश तावडे, दोडामार्ग युवा मोर्वा उपाध्यक्ष पराशर सावंत, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, प्रथमेश सावंत, युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



