सावंतवाडी : गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररीत्या ताब्यात बाळगल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी कारवाई करत एकूण ९ हजार ६८० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी सबनीसवाडा येथील सीसील जॉन फेराव (वय ५७) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मधील कलम ६५(e) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदानासमोर, सबनीसवाडा येथील आरोपीच्या राहत्या घराच्या पडवीत गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) सायंकाळी सुमारे ७.५५ वाजता पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे कोणताही वैध परवाना नसताना विविध प्रकारच्या मद्याचा साठा आढळून आला. कारवाईदरम्यान किंगफिशर प्रीमियम बीअरचे ५०० मिलीचे ११ टिन, तसेच गोवा बनावटीच्या MCDOWELLS NO.1, ROYAL CHALLENGE, BULLET 777 OLD CASHEW FENNY, COMMANDER XXX, OLD MONK आणि BLACK DELUXE WHISKY या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
जप्त करण्यात आलेल्या मद्यसाठ्याची एकूण किंमत ९,६८० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी अमित आनंद राऊळ (वय ४०), नेमणूक सावंतवाडी पोलीस ठाणे, यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा क्रमांक २६८/२०२६ नोंदविण्यात आला असून, आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(e) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री ११.०७ वाजता पूर्ण करण्यात आली. या प्रकरणात आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा/१११ शिंगाडे तपास करीत आहेत. कारवाईत पोहवा/३५२ धोत्रे व मपोशि/६३८ ठाकूर यांचा सहभाग होता. पोलिसांनी सायंकाळी ७.५५ ते रात्री १०.३० या कालावधीत कारवाई केली.
गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररीत्या साठवून ठेवण्याच्या प्रकारावर सावंतवाडी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध मद्यविक्री व वाहतुकीविरोधातील पोलिसांची कारवाई पुन्हा अधोरेखित झाली आहे.



