वेंगुर्ले : भविष्यातील संभाव्य दुष्काळाचे सावट, दिवसेंदिवस गंभीर होत जाणारी पाणीटंचाई आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महत्त्वाकांक्षी पाऊल टाकले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात ५० वनराई बंधारे उभारण्याच्या महाअभियानाचा आज, २ ऑक्टोबर रोजी वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे-गुरव टेंबवाडी येथून दिमाखात शुभारंभ झाला.

वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा आणि औपचारिक उत्सवाचा दिवस न ठेवता, ‘समाजासाठी काहीतरी देण्याचा दिवस’ म्हणून त्याचे रूपांतर करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विशेष म्हणजे, शुभारंभाच्या कार्यक्रमात विशाल परब यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून पहिला वनराई बंधारा घालत जलसंवर्धनाच्या महाअभियानाला प्रत्यक्ष कृतीची सुरुवात करून दिली.
यानंतर त्यांनी परिसरातील शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. एवढेच नव्हे, तर कोणताही औपचारिकपणाचा आव न आणता त्यांनी शेताच्या बांधावरच स्थानिक शेतकऱ्यांसोबत न्याहारीचा आस्वाद घेतला. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखाशी नाळ जोडणाऱ्या या आपुलकीच्या कृतीचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा कृतीतून संदेश!
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये टप्प्याटप्प्याने ५० वनराई बंधारे उभारण्यात येणार आहेत. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे, भूजलपातळी वाढविणे, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे आणि उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईला आळा घालणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
‘आज पाणी अडवूया, उद्याचे संकट टाळूया’ या विचारातून राबविण्यात येणारे हे अभियान गावागावांत जलसंवर्धनाची नवी जाणीव निर्माण करण्यासोबतच शेतकऱ्यांना पाण्याच्या शाश्वत नियोजनाकडे वळविणारे ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची किनार!
फुलांचे हार, शुभेच्छांचा वर्षाव आणि औपचारिक सत्कार यापलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष श्रमदान करत वाढदिवस साजरा करण्याचा विशाल परब यांचा उपक्रम उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला. जलसंधारणासारख्या दीर्घकालीन आणि लोकहिताच्या विषयाला वाढदिवसाच्या निमित्ताने जोडत त्यांनी सामाजिक बांधिलकीचा वेगळा आदर्श निर्माण केल्याची भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.
वेतोरे येथून सुरू झालेल्या या महाअभियानातून ५० बंधारे, हजारो घनमीटर पाणी अडविण्याचा प्रयत्न आणि भविष्यातील पाणीटंचाईविरुद्ध सामूहिक लढ्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती –
वेतोरे येथे झालेल्या या शुभारंभ सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक सचिन शेटये, सदानंद गिरप, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक, वेतोरे सरपंच प्राची नाईक, पालकरवाडी सरपंच सदाशिव ऊर्फ बंड्या पाटील, माजी तालुकाध्यक्ष बाळा सावंत, शैलेश जामदार, समीर कुडाळकर, सुधीर गावडे, विरोचन धुरी, दीपक करंगुटकर, आबा येरम, सूर्याजी नाईक, विक्रम सावंत, ताता गावडे, श्री. वेतोरकर, प्रशांत नाईक, राजेश सामंत, संतोष पेडणेकर, सुनील गडेकर, सुनील घाग यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, तरुण वर्ग, भाजपा कार्यकर्ते आणि जलसंधारण क्षेत्राशी संबंधित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वेतोरेच्या मातीत घातलेला हा पहिला वनराई बंधारा केवळ पाणी अडविणारा बंधारा नसून, भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उभ्या राहणाऱ्या सामूहिक जनचळवळीचा शुभारंभ ठरला आहे.



