सावंतवाडी : डोंगरदऱ्यांनी वेढलेला सह्याद्रीचा पट्टा… गावापासून दूर असलेली आरोग्य केंद्रे… उपचारासाठी लागणारा प्रवास, वेळ आणि पैसा… या साऱ्या अडचणींवर मात करत ‘रुग्णाच्या दारी आरोग्यसेवा’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविणाऱ्या सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ‘फिरता दवाखाना’ उपक्रमाने ग्रामीण आरोग्यसेवेला नवी दिशा दिली आहे. गेल्या दोन वर्षांत सावंतवाडी तालुक्यातील १९ दुर्गम गावांमधील तब्बल १८ हजार ९५३ रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना औषधोपचार देण्यात आले आहेत. त्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत राहणाऱ्या गोरगरीब व गरजू नागरिकांसाठी हा फिरता दवाखाना अक्षरशः ‘आरोग्याची संजीवनी’ ठरत आहे.

‘समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, नव्हे ती आपली जबाबदारीच आहे,’ या सामाजिक जाणिवेतून सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान गेल्या १३ वर्षांपासून सिंधुदुर्गात विविध आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबवत आहे. याच सेवाव्रताला अधिक व्यापक रूप देत प्रतिष्ठानने दोन वर्षांपूर्वी दुर्गम भागातील नागरिकांसाठी ‘ग्रँड मास्टर चोआ कॉक सुई फिरता दवाखाना’ सुरू केला.
या उपक्रमाला मुंबईतील योग विद्या प्राणिक हिलींग फाऊंडेशन ऑफ साऊथ मुंबई या सेवाभावी संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. वर्ल्ड प्राणिक हिलींग फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या संस्थेचे संस्थापक मास्टर चोआ कॉक सुई यांच्या नावाने हा फिरता दवाखाना कार्यरत आहे.
दोन वर्षांपूर्वी या फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण, तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले होते.

१९ गावांमध्ये आरोग्यसेवेची पालखी!
हा फिरता दवाखाना केवळ एक वाहन नसून, दुर्गम भागातील नागरिकांसाठी आरोग्याची चालती-बोलती आशा बनला आहे. दोन दिवसाआड सकाळच्या सत्रात फणसवडे, केसरी, दाणोली-गावठाण, पारपोली, देवसू, ओवळीये, वेर्ले, कुणकेरी आणि आंबेगाव या गावांमध्ये, तर सायंकाळच्या सत्रात न्हावेली, सोनुर्ली, वेत्ये, कास, सातोसे, निगुडे, डिंगणे, गाळेल, डोंगरपाल आणि नेतर्डे या दुर्गम भागांत तो पोहोचतो.
सकाळी ८ वाजता सावंतवाडीतून निघालेला हा आरोग्यरथ दुपारी एकच्या सुमारास परततो, तर दुपारी दोन वाजता पुन्हा मार्गस्थ होऊन सायंकाळी साडेसातपर्यंत सावंतवाडीत परततो. एका दिवसात दोन्ही सत्रांत प्रत्येकी दोन ते चार गावांमध्ये सेवा दिली जाते. रविवार तसेच महत्त्वाचे सण वगळता हा उपक्रम सातत्याने सुरू आहे.
१८,९५३ रुग्णांना मोफत उपचारांचा आधार!
गेल्या दोन वर्षांत सकाळच्या सत्रातील सेवेत ८,७२८ महिला आणि ५,९४३ पुरुष अशा एकूण १४,६७१ रुग्णांनी लाभ घेतला आहे. यावर्षी १ मार्चपासून सुरू झालेल्या सायंकाळच्या सत्रात २,६६३ महिला आणि १,६१९ पुरुष अशा एकूण ४,२८२ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
याशिवाय आतापर्यंत १,८२६ रुग्णांची रक्तातील साखरेची मोफत तपासणी करण्यात आली आहे.
गाडीमध्येच डॉक्टर, परिचारिका, रुग्णांसाठी आसनव्यवस्था, बेसिन, तपासणी कक्ष आणि स्वतंत्र औषध विभागाची सुविधा उपलब्ध आहे. डॉ. स्वप्नील परब, डॉ. नेहा परब, परिचारिका श्वेता सावळ, कोमल सावंत, चालक सुहास धुरी तसेच कार्यालयीन कामकाजासाठी वेदा गुरव हे या सेवेत योगदान देत आहेत.

प्रवासाचा खर्च वाचला अन् आधार गावातच मिळाला!
पूर्वी साध्या आजाराच्या उपचारासाठीही दुर्गम भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत होते. त्यासाठी प्रवासाचा खर्च, ये-जा करण्यातील वेळ आणि त्यात औषधांचा खर्च असा आर्थिक भार कुटुंबावर पडत होता. विशेषतः गोरगरीब रुग्णांना हा खर्च परवडत नसल्याने अनेकदा आजार अंगावर काढण्याची वेळ येत होती.
मात्र आता दवाखानाच रुग्णांच्या दारी पोहोचत असल्याने परिस्थिती बदलली आहे. तपासणीसोबत औषधेही मोफत मिळत असल्यामुळे हजारो रुग्णांना आर्थिक दिलासा मिळत असून, वेळेत उपचार मिळण्याने आरोग्यविषयक समस्या गंभीर होण्यापूर्वीच त्यावर उपचार करणे शक्य होत आहे.

डॉ. प्रवीणकुमार ठाकरे : सेवेचा ध्यास, समाजहिताचा श्वास!
सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवी7णकुमार ठाकरे आणि त्यांचे सहकारी प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून गेली १३ वर्षे जनसामान्यांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांपैकी फिरत्या दवाखान्याची जबाबदारी दीपक गावकर आणि भगवान रेडकर हे कार्यकर्ते सांभाळत आहेत.
आरोग्य, शिक्षण, सामाजिक सेवा आणि प्रबोधन अशा विविध क्षेत्रांत प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत आहे. आपल्या परिचयातील विविध सेवाभावी संस्थांच्या उपक्रमांचा लाभ गरजूंना मिळवून देण्याचे कामही डॉ. ठाकरे करीत आहेत.
याच सेवाव्रतातून योग विद्या प्राणिक हिलींग फाऊंडेशनच्या सहकार्याने हा फिरता दवाखाना सुरू करण्यात आला. मुंबईतील ही संस्था डॉ. ठाकरे यांच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून सिंधुदुर्गात विविध उपक्रम राबवत आहे.
“गोरगरीब आणि गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान हेच आमच्या आरोग्यसेवेचे खरे यश आहे. आगामी काळात या सेवेचा विस्तार करून आणखी दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा प्रतिष्ठानचा संकल्प आहे,” असे डॉ. ठाकरे यांनी सांगितले.
आरोग्यसेवेबरोबर सामाजिक बांधिलकीचीही अखंड वाटचाल
सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या कार्याची व्याप्ती केवळ फिरत्या दवाखान्यापुरती मर्यादित नाही. प्रतिष्ठानने दुर्गम व ग्रामीण भागात ३५ मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करून ३,८४७ रुग्णांची तपासणी केली असून त्यांना मोफत औषधे देण्यात आली आहेत.
तसेच १६ शाळांमधील ७३७ विद्यार्थ्यांची रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी, कै. डॉ. डी. बी. खानोलकर रुग्ण सेवा केंद्राच्या माध्यमातून ८७१ गरजूंना रुग्णोपयोगी साहित्याचा मोफत वापर, कोविड काळातील उल्लेखनीय सेवा, गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत, शैक्षणिक साहित्याचे वितरण, २० शाळांमध्ये ‘शब्दगंध’ वाचनालये, तसेच शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांचे दरवर्षी शिवव्याख्यान असे विविध उपक्रम प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहेत.
‘दवाखाना’ नव्हे, तर माणुसकीची चालती-फिरती सावली!
दुर्गम भागातील नागरिकांसाठी आरोग्यसेवा म्हणजे आजही अनेकदा संघर्षाची वाट. मात्र सिंधुमित्रच्या फिरत्या दवाखान्याने ही वाट काहीशी सुकर केली आहे. जिथे रुग्ण दवाखान्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तिथे दवाखानाच रुग्णापर्यंत पोहोचतोय, ही या उपक्रमाची सर्वांत मोठी जमेची बाजू आहे.
गावोगावी फिरणाऱ्या या आरोग्यरथाच्या चाकांबरोबर केवळ औषधेच फिरत नाहीत; सोबत फिरतोय माणुसकीचा हात, सेवाभावाची ऊब आणि ‘आपण एकटे नाही’ हा विश्वास!
दोन वर्षांत जवळपास १९ हजार रुग्णांच्या आयुष्यात आरोग्याचा प्रकाश पेरणाऱ्या या उपक्रमाने ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे सिंधुमित्र प्रतिष्ठानचा हा ‘फिरता दवाखाना’ आज सह्याद्रीच्या कुशीत आरोग्याची संजीवनी घेऊन फिरणारा लोकसेवेचा रथ ठरला आहे.



