ऑटिझमच्या आव्हानांवर ‘स्टेपिंग स्टोन’ची संवेदनशील साथ! ;  कोलगाव येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये अत्याधुनिक थेरपी लॅबची उभारणी, गरजू मुलांना शास्त्रशुद्ध उपचाराची सुविधा!  मुलांच्या क्षमतांना योग्य दिशा देण्यासाठी पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा! : ॲड. रुजूल पाटणकर.

सावंतवाडी : मुलांच्या चेहऱ्यावर उमलणारे हास्य, त्यांच्या बोबड्या बोलांमधून उमटणारे भावविश्व आणि त्यांच्या छोट्याशा जगातील प्रत्येक हालचाल ही पालकांसाठी आनंदाची पर्वणी असते. मात्र काही मुलांच्या विकासाच्या प्रवासात संवाद, सामाजिक वर्तन, संवेदनशीलता आणि शिकण्याच्या प्रक्रियेत काही वेगळेपणा जाणवतो. अशा मुलांना योग्य वेळी योग्य आधार, शास्त्रशुद्ध उपचार आणि संवेदनशील मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेचे असते. याच सामाजिक जाणिवेतून स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे चेअरमन ॲड. रुजूल पाटणकर यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला असून, कोलगाव येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ऑटिझम व संबंधित विकासात्मक अडचणी असलेल्या मुलांसाठी प्रशस्त थेरपी लॅब उभारण्यात आली आहे.

या सुविधेच्या माध्यमातून गरजू मुलांना तज्ज्ञ थेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने थेरपी उपलब्ध करून देण्यात येत असून, जिल्ह्यातील पालकांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲड. रुजूल पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

यावेळी बोलताना ॲड. पाटणकर यांनी ऑटिझमविषयी समाजामध्ये असलेल्या गैरसमजांवरही प्रकाश टाकला. ऑटिझम हा संसर्गजन्य आजार नसून मेंदूच्या विकासाशी संबंधित न्यूरो-विकसनात्मक स्थिती आहे. त्याची लक्षणे बालपणात दिसून येऊ शकतात; मात्र प्रत्येक मुलामध्ये त्याचे स्वरूप आणि तीव्रता वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येक मुलाकडे त्याच्या वैयक्तिक गरजा आणि क्षमतांचा विचार करून पाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लक्षणांकडे दुर्लक्ष नको!

नावाने हाक मारल्यानंतर वारंवार प्रतिसाद न देणे, डोळ्यांत डोळे घालून संवाद साधण्याचे प्रमाण कमी असणे, बोलण्यास उशीर होणे, शब्दांचा मर्यादित वापर, इतर मुलांबरोबर खेळण्यात किंवा संवाद साधण्यात कमी रस असणे, एकाच कृतीची वारंवार पुनरावृत्ती करणे, हात हलविणे किंवा वस्तू सतत फिरवत राहणे, ठराविक दिनक्रमात बदल झाल्यास अस्वस्थ होणे, एखाद्या विशिष्ट वस्तू किंवा विषयामध्ये अतिशय जास्त रस असणे तसेच आवाज, प्रकाश, स्पर्श, वास किंवा चवीबाबत अधिक संवेदनशीलता जाणवणे, अशी विविध लक्षणे काही मुलांमध्ये दिसून येऊ शकतात. मात्र ही लक्षणे दिसली म्हणून मुलाला ऑटिझम आहेच, असा निष्कर्ष पालकांनी स्वतःहून काढू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘लवकर ओळख, योग्य हस्तक्षेप’ महत्त्वाचा

ऑटिझमचे निदान करण्यासाठी कोणतीही एकच रक्तचाचणी किंवा एकच वैद्यकीय चाचणी पुरेशी नसते. मुलाचा विकास, भाषा, सामाजिक संवाद, वर्तन, खेळण्याची पद्धत आणि दैनंदिन कौशल्ये यांचे सर्वंकष मूल्यमापन आवश्यक असते. गरजेनुसार विकासतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, स्पीच थेरपिस्ट आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट यांची मदत घेतली जाऊ शकते.

ऑटिझमसाठी एकच औषध नसले तरी योग्य वेळी सुरू केलेली थेरपी मुलाच्या विकासाला निश्चितच दिशा देऊ शकते. स्पीच अँड लँग्वेज थेरपीमुळे भाषा व संवादकौशल्य विकसित करण्यास, ऑक्युपेशनल थेरपीमुळे दैनंदिन कौशल्ये व संवेदनात्मक अडचणी हाताळण्यास, तर विविध विकासात्मक व वर्तनात्मक हस्तक्षेपांमुळे सामाजिक आणि शिकण्याची कौशल्ये विकसित करण्यास मदत होऊ शकते.

मुलांच्या क्षमतांना मिळणार विकासाची नवी वाट!

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये उभारण्यात आलेल्या प्रशस्त थेरपी लॅबमध्ये तज्ज्ञ थेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध पद्धतीने आवश्यक थेरपी व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुलांच्या अडचणींकडे केवळ समस्या म्हणून न पाहता त्यांच्या क्षमतांना ओळखून त्यांना विकासाची योग्य दिशा देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे ॲड. पाटणकर यांनी सांगितले.

“प्रत्येक मूल हे वेगळे असते. त्याच्या क्षमता, गरजा आणि विकासाचा वेगही वेगळा असतो. त्यामुळे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले, तर मुलाच्या क्षमतांना अधिक चांगल्या प्रकारे विकसित करण्यास मदत होऊ शकते. पालकांनी संकोच न करता आपल्या मुलांच्या विकासाबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि उपलब्ध सुविधेचा लाभ घ्यावा,” असे आवाहन ॲड. रुजूल पाटणकर यांनी केले.

ऑटिझमच्या अंधुक वाटेवर पालकांच्या हातात विश्वासाचा दिवा देत, मुलांच्या क्षमतांना नवी भरारी देण्याच्या दिशेने स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलने उचललेले हे पाऊल निश्चितच आश्वासक ठरणारे आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles