कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आशिये ग्रामपंचायत व कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने वनराई बंधारा आशिये टेंब़वाडी येथे उभारला. पाणी हेच जीवन असून, त्याचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष श्रमदानातून देत आशिये ग्रामपंचायत हद्दीत भविष्यातील पिढीने जलसाक्षरतेचे धडे घेतले. या वनराई बंधारा उपक्रमात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पत्रकार, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि महिला शेतकरी गटांच्या सदस्यांसमवेत श्रमदान केले.कणकवलीत पत्रकारांनी वनराई बंधारा करत समाजासमोर आदर्श निर्माण आहे.

आशिये ग्रामपंचायत व कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे सामाजिक बांधिलकीचा संदेश देत जलसंधारणासाठी वनराई बंधारा बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमात प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, सरपंच महेश गुरव, तालुका कृषी अधिकारी प्रवीण ओहोळ, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रामचंद्र शिंदे, कृषी विभागाचे विस्तार अधिकारी प्रवीण ठाकूर, उपसरपंच संदीप जाधव,जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, सचिव बाळ खडपकर, उपाध्यक्ष संतोष राऊळ, कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, सचिव संजय सावंत, खजिनदार रोशन तांबे, उपाध्यक्ष नितीन कदम, उमेश बुचडे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, रमेश जोगळे , माजी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई, वीरेंद्र चिंदरकर, महेश सरनाईक, आनंद तांबे, राजन चव्हाण, सुधीर राणे, संजय बाणे, रमाकांत बाणे, तुषार हजारे, विराज गोसावी, रंजिता तहसीलदार,दर्शन सावंत, विनोद जाधव, प्रथमेश जाधव,ग्रा. पं. सदस्य सुहास गुरव, माजी सरपंच शंकर गुरव, सदानंद बाणे, पाडुरंग बाणे, सत्यवान धुरी, प्रवीण ठाकूर, निलेश ठाकूर, मिलिंद करंबेळकर, सुहास खानोलकर , ग्रामसेवक राकेश गोवळकर, मुख्याध्यापिका वृषाली मसुरकर, श्री. कदम, विजय मसुरकर, श्रीमती पांचाळ, निधी पुजारे, प्रकाश गुरव यांच्यासह वनराई बंधारा उभारणीच्या या उपक्रमात शालेय विद्यार्थी, महिला शेतकरी गट, ग्रामस्थ, पत्रकार तसेच तालुका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या ‘जलतारा’ कामाचीही पाहणी केली.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, मागील ३५-४० वर्षांच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा सर्वात निचांकी पाऊस झाला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून, राज्य शासनाने जिल्ह्यात दुष्काळाचा ट्रिगर वन लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहून जाणारे पाणी बंधा-यातून अडवून ते त्याच ठिकाणी जिरवणे, तसेच विहिरी आणि तलावांची पाणीपातळी वाढविणे हा पुढील ७-८ महिन्यांसाठी पाणी टिकवून ठेवण्याचा सर्वात सोपा आणि कमी खर्चाचा उपाय आहे. या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात लोकसहभागातून १० हजार वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. आशिये येथे ग्रामपंचायत व कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे वनराई बंधारा बांधण्यात आला. लोकसहभाग पाहता सर्वांचे कौतुक आहे.
कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा ट्रीगर 1 मध्ये असून पालकमंत्री नितेश राणे व जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे तसेच प्रशासनाकडून वनराई बंधारा बांधण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार समाजातील पत्रकार हा प्रमुख घटक म्हणून आमचीही जबाबदारी आहे. त्यादृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांच्यावतीने पत्रकारांच्या वतीने पहिला बंधारा कणकवली – आशिये येथे बांधण्यात आला आहे. त्यामुळे समाजातील विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेवून जलसंधारणाच्या कामात हातभार लावावा.
शालेय विद्यार्थ्यांनी जिल्हाधिका-यांसमवेत केले श्रमदान –

जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड मिळत आहे. पावसाचे पाणी वाहून न जाता ते स्थानिक पातळीवर अडवून जिरविणे, भूजल पातळी वाढविणे आणि उपलब्ध पाणीसाठा अधिक काळ टिकविणे या उद्देशाने वनराई बंधारे उभारले जात आहेत. या उपक्रमात आशिये गावातील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतल्याने जलसंधारणाचे महत्त्व त्यांच्या कृतीतूनच त्यांच्या मनावर बिंबविले गेले. वनराई बंधारा उभारणीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना श्रमाची प्रतिष्ठा, पाणी बचत, जलस्रोतांचे संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण यांचे महत्त्व अनुभवातून समजले. केवळ जलसंधारणाबाबत माहिती देण्यापेक्षा प्रत्यक्ष श्रमदानात सहभागी करून घेणे हा विद्यार्थ्यांमध्ये जलसाक्षरता निर्माण करण्याचा प्रभावी मार्ग ठरला आहे.



