सावंतवाडी नगरपरिषदेतील पाणीपुरवठा विभागातील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करा! ; शिवसेना नगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे!

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील महत्त्वाचे वस्तू नोंद व वापर रजिस्टर गायब करून त्याची विल्हेवाट लावल्याच्या प्रकरणाने नगरपरिषद प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणासह जानेवारी २०२६ पासून पाणीपुरवठा विभागात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारांची उच्चस्तरीय, पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे सादर करण्यात आले.

नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनानुसार, पाणीपुरवठा विभागातील महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज असलेले वस्तू नोंद व वापर रजिस्टर गायब झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी या संपूर्ण प्रकरणातील विरोधाभास आणि नगरपालिकेची भूमिका संशयास्पद वाटत असल्याचा दावा नगरसेवकांनी केला आहे.

‘रजिस्टर गायब, मग व्यवहारांचा हिशेब कुठे?’ असा सवाल उपस्थित करत, या दस्तऐवजाच्या अनुपस्थितीत विभागातील वस्तूंची खरेदी, वापर, शिल्लक तसेच आर्थिक व्यवहारांची पडताळणी कशी होणार, असा प्रश्नही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.

जनतेच्या करातून जमा होणारा पैसा हा सार्वजनिक हितासाठी वापरणे बंधनकारक आहे. त्यामुळे शासकीय नोंदवही गायब होणे हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणाचा विषय नसून, त्यामागे आर्थिक अनियमितता किंवा गैरव्यवहाराची शक्यता आहे का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे नगरसेवकांनी म्हटले आहे.

‘चौकशीपासून प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना दूर ठेवा’

या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी संबंधित विभागीय प्रक्रियेत सहाय्यक आयुक्तांना दूर ठेवावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. ते सध्या सावंतवाडी नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून पदभार सांभाळत असल्याने त्यांच्या प्रभावाशिवाय चौकशी झाल्यासच ती निष्पक्ष आणि पारदर्शक राहील, अशी भूमिका नगरसेवकांनी मांडली आहे.

जानेवारी २०२६ पासूनच्या प्रत्येक व्यवहाराची तपासणी करा!

जानेवारी २०२६ पासून पाणीपुरवठा विभागात झालेल्या प्रत्येक आर्थिक व्यवहाराची, खरेदीची, वस्तूंच्या नोंदीची आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कोणताही पक्षपात न करता कठोर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

“हा जनतेचा पैसा आहे. त्याचा अपहार किंवा गैरवापर झाला असेल तर दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जनतेला सत्य समोर आणावे,” अशी मागणी शिवसेना नगरसेवकांनी केली आहे.

यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख तथा नगरसेविका ॲड. निता सावंत-कविटकर, नगरसेवक देव्या सूर्याजी, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, ॲड. सायली दुभाषी आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles