आंबोली : फुटबॉलच्या मैदानावर जिद्दीची मशाल पेटवत, शिस्तीच्या बळावर विजयाची पताका उंचावत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, आंबोलीच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरीची नोंद केली आहे. १४, १७ आणि १९ वर्षे अशा तिन्ही वयोगटांत जिल्हास्तरीय विजेतेपद पटकावत आंबोलीच्या सैनिकांनी विजेतेपदाची शानदार हॅट्ट्रिक साधली. तालुकास्तरापासून सुरू झालेला विजयाचा झंझावात जिल्हास्तरावरही कायम ठेवत या संघांनी फुटबॉलच्या मैदानावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
क्रीडा व युवक संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ही जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तालुकास्तरीय स्पर्धेत तिन्ही वयोगटांत विजेतेपद मिळवून जिल्हास्तरासाठी पात्र ठरलेल्या आंबोलीच्या संघांनी जिल्हास्तरावरही विजयी घोडदौड कायम ठेवत प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः झुंजवून सोडले.

१४ वर्षे वयोगटात गोलांचा धडाका!, ५–० ने कुडाळचा धुव्वा!
१४ वर्षे शालेय मुले वयोगटाच्या अंतिम सामन्यात आंबोलीच्या संघाने कुडाळ संघाचा तब्बल ५–० असा एकतर्फी पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्वीकारलेल्या आंबोलीच्या खेळाडूंनी संपूर्ण सामन्यावर आपली पकड कायम ठेवली.
या सामन्यात देव्यांश मुद्रास याने दोन गोल करत संघाच्या विजयाचा पाया रचला. वर्धन मलिक, युगांक राणे आणि संजीत पास्ते यांनी प्रत्येकी एक गोल करत कुडाळच्या बचावफळीला अक्षरशः हादरवून सोडले.
१७ वर्षे वयोगटातही विजयाची पताका!
१७ वर्षे शालेय मुले वयोगटात आंबोलीच्या संघाने उपांत्य सामन्यात दोडामार्ग संघाचा १–० असा पराभव करत अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला. या सामन्यात आयुष बाणे याने केलेला निर्णायक गोल आंबोलीसाठी विजयाची गुरुकिल्ली ठरला.
अंतिम सामन्यात पुन्हा एकदा कुडाळ संघाशी आमनेसामने झालेल्या लढतीत आंबोलीने १–० असा विजय मिळवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अथर्व कांबळे याने केलेला एकमेव गोल संघासाठी ‘विजयाचा सोनेरी क्षण’ ठरला.

१९ वर्षे वयोगटात पेनल्टी शूटआऊटचा थरार!
१९ वर्षे शालेय मुले वयोगटात आंबोलीच्या संघाने विजयाची कमान आणखी भक्कम केली. उपांत्य सामन्यात वैभववाडी संघाचा ४–० असा दणदणीत पराभव करत आंबोलीने अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात महादेव देऊलकरने तब्बल तीन गोल करत हॅट्ट्रिक साधली, तर जय गावडे याने एक गोल नोंदवत विजयात मोलाची भर घातली.
अंतिम सामन्यात आंबोली आणि कुडाळ यांच्यात अक्षरशः ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळाली. निर्धारित वेळेत दोन्ही संघांच्या खेळाडूंनी गोल करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र दोन्ही संघांच्या भक्कम बचावामुळे सामना ०–० असा बरोबरीत राहिला.
त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये मैदानावरील प्रत्येक क्षण उत्कंठा वाढवणारा ठरला. मात्र दबावाच्या क्षणीही आंबोलीच्या सैनिकांनी संयम आणि आत्मविश्वासाची साथ सोडली नाही. महादेव देऊलकर, जय गावडे, ऑस्टिन ब्रिटो आणि ओंकार गावडे यांनी प्रभावी पेनल्टी घेतल्यानंतर निर्णायक क्षणी पौरस नाटेकर आणि अथर्व देसाई यांनी गोल नोंदवत आंबोलीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तिन्ही वयोगटांत विजयाची ‘गोल्डन हॅट्ट्रिक’!
१४, १७ आणि १९ वर्षे या तिन्ही वयोगटांत विजेतेपद मिळवत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीने जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत अभूतपूर्व ‘विजेतेपदाची हॅट्ट्रिक’ साधली. मैदानावरील शिस्त, अखंड सराव, संघभावना, जिद्द, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट सांघिक समन्वय यामुळे या ऐतिहासिक यशाची पायाभरणी झाली.
या शानदार कामगिरीबद्दल शाळेचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ, सचिव श्री. जॉय डांटस, प्राचार्य श्री. नितीन गावडे आणि कार्यालयीन सचिव श्री. दीपक राऊळ तसेच समस्त पालकवर्गाने सर्व विजेत्या खेळाडू, क्रीडा शिक्षक आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. आगामी विभागीय स्पर्धेसाठी संघाला शुभेच्छा दिल्या.
आंबोलीच्या डोंगररांगांमधून घुमलेला विजयाचा हा जयघोष आता जिल्ह्याच्या क्रीडा विश्वातही दुमदुमला आहे. फुटबॉलच्या मैदानावर तिन्ही वयोगटांत विजेतेपदाचा झेंडा रोवत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीने आपल्या क्रीडा वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.



