सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेच्या कौन्सिल बैठकीपूर्वीच सभापतींच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले. सभापतींच्या राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सभेपूर्वीच आपली भूमिका ठामपणे मांडत, “पाणीपुरवठा सभापतींचा राजीनामा झाला पाहिजे, अन्यथा सभा सुरू करू नये,” अशी स्पष्ट मागणी केली.
नगरपालिकेच्या सभागृहात बैठक सुरू होण्यापूर्वीच या मागणीने वातावरणात तणाव निर्माण झाला. सभापतींच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर संजू परब यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांसमोर आपली भूमिका मांडली. या मागणीवरून सभेच्या कामकाजाबाबत अनिश्चितता निर्माण झाली.
दरम्यान, या घडामोडींनंतर शिंदे शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी सभा सोडून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कौन्सिल बैठकीच्या सुरुवातीलाच राजकीय संघर्षाचे चित्र पाहायला मिळाले.
पाणीपुरवठा सभापतींच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक ठाम राहणार की या प्रकरणावर तोडगा निघणार, याकडे आता सावंतवाडीकरांचे लक्ष लागले आहे.** नगरपालिकेतील या घडामोडींमुळे आगामी राजकीय हालचालींबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.



