सावंतवाडी : वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा वर्षाव, जाहिरातींची झळाळी आणि पोस्टरबाजीचा गाजावाजा नव्हे, तर समाजऋण फेडण्याची आणि गरजूंच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविण्याची संधी! याच सेवाभावी विचाराला कृतीची जोड देत, ‘पोस्टरऐवजी आरोग्यसेवा’ हा प्रेरणादायी संदेश घेऊन बांदा येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडो रुग्णांनी या शिबिरात सहभागी होत मोफत आरोग्यसेवेचा लाभ घेतला. भाजप युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाने सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय घडवून आणला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान–२०२६’ अंतर्गत, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहेत. भाजपा सिंधुदुर्ग आणि कोकण संस्था, मुंबई यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिरांच्या मालिकेतील दुसऱ्या दिवसाचे शिबिर बांदा जिल्हा परिषद क्षेत्रात पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ भाजप नेते श्यामकांत काणेकर आणि भाजप महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप युवा नेते विशाल परब, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, बांदा सरपंच प्रियांका नाईक, रुपाली शिरसाठ, उन्नती धुरी, मधुकर देसाई, ऋतिका नाईक, प्रियांका देसाई, सामाजिक कार्यकर्ते दयानंद कुबल, शहराध्यक्ष विकी कदम, जावेद खतिब, राजाराम सावंत, शितल राऊळ, प्रसाद पावसकर, नितीन सावंत, निलेश नाटेकर, बाबा काणेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नामांकित रुग्णालयांचे सहकार्य; ग्रामीण जनतेसाठी आरोग्यसेवेचे दालन खुले!
ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय मार्गदर्शन सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रुबी हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, अथायु हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांचे या उपक्रमाला सहकार्य लाभले.
आरोग्यसेवा हीच खरी लोकसेवा, या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वैद्यकीय सुविधांचा लाभ घेण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळाली. दैनंदिन धावपळीत किंवा आर्थिक अडचणींमुळे आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांसाठी हा उपक्रम दिलासादायक ठरला.
वाढदिवसाचा जल्लोष नव्हे, सेवाकार्याचा संकल्प!
वाढदिवसाच्या निमित्ताने समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देण्याचा विशाल परब यांचा संकल्प या महाआरोग्य शिबिरांच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरविण्यात येत आहे. शुभेच्छांच्या शब्दांपेक्षा कृतीतून माणुसकी जपण्याचा आणि समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा हा प्रयत्न विशेष लक्षवेधी ठरला. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानही करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली शिरसाठ यांनी केले. सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी केले, तर बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले.
‘पोस्टरपेक्षा माणूस महत्त्वाचा, प्रसिद्धीपेक्षा सेवाभाव श्रेष्ठ!’ हा विचार कृतीतून अधोरेखित करणाऱ्या या महाआरोग्य शिबिराने सामाजिक उत्तरदायित्वाचा एक सकारात्मक संदेश दिला. आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजाशी नाळ जोडण्याचा हा उपक्रम नागरिकांसाठी दिलासादायक ठरला असून, सेवाभावी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याच्या संकल्पनेला नवी दिशा मिळाली आहे.



