विशाल परब २०२९ मध्ये आमदार व्हायलाच पाहिजेत! – आमदार प्रमोद जठार यांचे भावनिक आवाहन. ; वेंगुर्ल्यात महाआरोग्य शिबिराला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद! ; “विशाल म्हणजे जनतेला सुख देणारा संवेदनशील युवा नेता!” ; विशाल परब यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत जठार यांनी व्यक्त केला विश्वास.

वेंगुर्ला : “विशाल परब २०२९ मध्ये आमदार व्हायलाच पाहिजेत! त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या; जनता त्यांना आमदार करणारच!” असे भावनिक आवाहन करत भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी वेंगुर्ला येथे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. “विशाल म्हणजे जनतेला सुख देणारा संवेदनशील युवा नेता,” अशा शब्दांत त्यांनी युवा नेते विशाल परब यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. पुढील १०० वर्षे भाजप सत्तेत राहील, असे भाकीतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेताळ प्रतिष्ठान तुळस, भाजपा वेंगुर्ला आणि इनरव्हील क्लब वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत आरोग्यसेवेच्या या लोकाभिमुख उपक्रमाला उत्स्फूर्त दाद दिली.

 

भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपा राज्य युवा नेते विशाल परब, वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, सौ. जठार, डॉ. चौगुले, सचिन शेट्ये, नगरसेविका सुषमा खानोलकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

जठारांच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण!

वेंगुर्ला येथील महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने आमदार प्रमोद जठार यांनी विशाल परब यांच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले. समाजातील सामान्य माणसाच्या सुख-दुःखाशी नाते जोडणारा, जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा युवा नेता म्हणून त्यांनी विशाल परब यांचा गौरव केला. त्यांच्या कार्याला जनतेने आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन करत २०२९ मध्ये विशाल परब आमदार व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली.

“राज्यकर्ता हा संवेदनशील असावा,” असे सांगताना जठार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा उल्लेख केला. २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर महिलांच्या अडचणी लक्षात घेऊन उज्ज्वला गॅस योजनेसारख्या उपक्रमांतून दिलासा देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यावरही त्यांनी भर दिला. वेंगुर्ला हे आनंदी ठिकाण असून येथील माणसे मनाने मोठी आहेत, अशा शब्दांत त्यांनी वेंगुर्लावासीयांचे कौतुक केले.

आरोग्यसेवेतून वाढदिवसाचा सेवायज्ञ!

वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा वर्षाव आणि उत्सवाचा जल्लोष नव्हे, तर समाजाप्रती असलेले ऋण फेडण्याची संधी, हा विचार विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिरातून अधोरेखित झाला. आरोग्य हा आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचा विषय असून सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

उष्ण वातावरणाची पर्वा न करता नागरिकांनी शिबिरासाठी मोठी गर्दी केली. शिबिराला मिळालेला प्रतिसाद हा आरोग्यविषयक जनजागृतीबरोबरच सामाजिक उपक्रमांबद्दल नागरिकांच्या मनात असलेल्या विश्वासाचेही प्रतीक ठरला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या सेवाभावी उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

“आरोग्याची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य!” — विशाल परब

युवा नेते विशाल परब यांनी आपल्या मनोगतात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिला आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. “आज नवरात्रोत्सव साजरा करत असताना आपल्या लाडक्या भगिनी आणि भावंडांच्या आरोग्याची काळजी घेणे आमचे कर्तव्य आहे. नागरिकांच्या आरोग्याला योग्य न्याय मिळावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सामाजिक कार्य सुरू असून भविष्यातही ते अधिक जोमाने सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या हाकेला मनापासून साथ देणारे आमदार प्रमोद जठार यांचे त्यांनी आभार मानले. “मी भाजपचा एक छोटासा कार्यकर्ता आहे; मात्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार प्रमोद जठार यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत,” असे नम्रपणे सांगत त्यांनी सेवाकार्याची भूमिका स्पष्ट केली.

विशाल परब यांच्या कार्याला सलाम! — नगराध्यक्ष राजन गिरप

वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजन गिरप यांनी विशाल परब यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. “आजच्या घडीला आरोग्य हा सर्वांत महत्त्वाचा विषय आहे. विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद त्यांच्या कार्याची पोहोच अधोरेखित करतो,” असे ते म्हणाले.

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विशाल परब यांनी राबविलेल्या उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले. तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेला वैकुंठ रथ दान करण्याच्या त्यांच्या निर्णयाचा उल्लेख करत, “हे त्यांचे मोठे दातृत्व आहे. त्यांच्या कार्याला सलाम,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

सुषमा खानोलकर यांच्याकडून सेवाभावी उपक्रमाचे कौतुक

नगरसेविका सुषमा खानोलकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराला संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू झालेल्या सेवाभावी उपक्रमांच्या प्रेरणेतूनही सामाजिक कार्याला चालना मिळत असून, अशा उपक्रमांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. विशाल परब यांच्या सामाजिक सेवेला त्यांनी मानवंदना दिली.

मान्यवरांचा गौरव; आशा स्वयंसेविकांचा विशेष सन्मान

महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार प्रमोद जठार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. समाजसेवेचे व्रत जपणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान तुळस आणि इनरव्हील क्लब वेंगुर्ला यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा दुवा असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील आशा स्वयंसेविकांना युवा नेते विशाल परब यांच्या वतीने विशेष भेटवस्तू देण्यात आल्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या भेटवस्तू प्रदान करून त्यांच्या सेवाभावी कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

नियोजनबद्ध आयोजन; मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सचिन परुळकर यांनी केले. बादल चौधरी आणि निलेश गुरव यांनी सूत्रसंचालन केले, तर बाळू देसाई यांनी आभार प्रदर्शन केले.

आरोग्यसेवेचा हात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या या महाआरोग्य शिबिराने वाढदिवसाच्या निमित्ताने समाजसेवेचा नवा आदर्श अधोरेखित केला. हजारो नागरिकांचा सहभाग, सामाजिक संस्थांचा पुढाकार आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे वेंगुर्ल्यातील हा आरोग्यसेवेचा उपक्रम विशेष चर्चेचा विषय ठरला. त्यातच आमदार प्रमोद जठार यांनी विशाल परब यांच्या २०२९ मधील संभाव्य आमदारकीबाबत व्यक्त केलेल्या विश्वासामुळे या कार्यक्रमाला सामाजिक कार्यासोबतच राजकीय महत्त्वही प्राप्त झाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles