सावंतवाडी रेल्वे टर्मिनसबाबतही सकारात्मक : वंदे भारतला थांबा देणार
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेबाबत जातीने लक्ष देणार
सावंतवाडी : एअर इंडियाच्या अलायन्स एअर या उपकंपनीमार्फत चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ ते मुंबई आणि मुंबई ते सिंधुदुर्ग मार्गावर विमानसेवा सुरू होती. ही विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती. मात्र, त्याची मुदत २६ ऑक्टोबर रोजी संपली असून हा करार वाढवून देण्यासंदर्भात माझी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यामुळे लवकरच ही वाहतूक पुन्हा सुरळीतपणे सुरू होईल, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी दिली. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरेगावकर, तालुका मंडल अध्यक्ष महेश धुरी, रवी मडगावकर, अजय गोंदावळे आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग चिपी येथील विमानतळावर सुरू असलेली मुंबई ते सिंधुदुर्ग ही उड्डाणसेवा २६ ऑक्टोबर पासून बंद होत आहे याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर माहिती देताना त्यांनी आपली केंद्रीय मंत्र्यांची याबाबत चर्चा झाली असून लवकरच या कंपनीला मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती दिली. इंडिगो व अन्य इच्छुक कंपन्यांबाबत देखील विचार विनिमय सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, सावंतवाडी रेल्वे टर्मिनस बाबत देखील रेल्वे मंत्र्यांशी चर्चा झाली असून रेल्वे टर्मिनसचे अपूर्ण काम पूर्ण करणे तसेच तेथे सोयी सुविधा वाढविण्यासंदर्भात मागणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सावंतवाडी मतदारसंघात ‘वंदे भारत’ व मेंगलोर एक्सप्रेसला थांबा देण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेन असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या सुविधा तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची असलेली वानवा याबाबत आपण लवकरच आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करणार आहे. तसेच पुढील दौऱ्यात स्वतः उपजिल्हा रुग्णालयात भेट देत तेथील परिस्थिती जाणून घेणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
गोवा येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चालकांच्या बॅच संदर्भात जो प्रश्न निर्माण झाला आहे त्याबाबत देखील माझी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच याबाबत तोडगा काढण्यात येईल. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी आडाळी एमआयडीसी येथे लवकरच मेडिकल उपकरणे निर्माण करणारे कारखाने सुरू करण्यात येतील. ओरोस सिंधुदुर्ग येथे मी केंद्रीय मंत्री असताना प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे काम सुरू केले आहे त्या माध्यमातून देखील रोजगार निर्मितीसाठी भविष्यात जास्तीत जास्त प्रयत्न केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विक्रमी मताधिक्याने निवडून येणार आहेत. कुडाळ व कणकवली येथे आम्ही विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करणार आहोत त्या दृष्टीने आमचे नियोजन सुरू आहे तर सावंतवाडी येथे देखील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विजयासाठी मी जातीने लक्ष देत असून येथे देखील मोठ्या मताधिक्याने विजय होईल असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आम्ही महायुती सरकारने मागील अडीच वर्षात केलेल्या विधायक लोककल्याणकारी व लोकहिताच्या योजना घेऊन जनतेपर्यंत जात आहोत. केंद्राच्या माध्यमातून देखील महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या विविध योजना तसेच सर्वसामान्य जनतेच्या उत्कर्षासाठी करण्यात आलेले विधायक कार्य हा आमचा अजेंडा घेऊन आम्ही मतदारांपर्यंत जाणार आहोत. मात्र, विरोधकांकडे कोणताही विकासाचा मुद्दा नसून त्यांनी या जिल्ह्यासाठी काहीही केलेले नाही त्यामुळे जनताच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना या निवडणुकीत कायमचे घरी बसवेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.