सावंतवाडी : जिद्दीच्या जोरावर ध्येयाचा वेध घेत, मेहनतीच्या बळावर यशाची शिखरे सर करण्याची किमया सावंतवाडी येथील मिलाग्रीस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु. वैभवी दीपक लोके हिने साधली आहे. शालेय क्रीडा स्पर्धेत (School Games) किकबॉक्सिंग या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत तिने आपल्या गुणवत्तेची प्रभावी छाप उमटवली असून, तिची विभागस्तरीय (Zonal Level) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वैभवीच्या या यशस्वी भरारीमुळे शाळेच्या क्रीडावैभवात मानाचा नवा तुरा रोवला गेला आहे.
क्रीडांगणावर कौशल्य, चपळाई, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर आपले वेगळेपण सिद्ध करणाऱ्या वैभवीने आपल्या कर्तृत्वातून यशाची नवी वाट खुली केली आहे. तिच्या या निवडीमुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली असून, विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास यशाची उंच भरारी घेता येते, याचीच प्रचिती आली आहे.
वैभवीने संपादन केलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल मिलाग्रीस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य रिचर्ड सालढाणा तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले. आगामी स्पर्धेतही तिने आपल्या खेळाची चमक दाखवत यशाची परंपरा कायम राखावी, यासाठी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
वैभवीच्या कर्तृत्वाला नवी झेप, जिद्दीला यशाची साथ आणि उज्ज्वल क्रीडा भवितव्याला विजयाची किनार लाभो, हीच सदिच्छा! तिच्या या यशामुळे मिलाग्रीसच्या क्रीडा परंपरेला नवी ऊर्जा मिळाली असून, तिच्या पुढील कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.



