सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या ड्रेनेजचा दुर्गंधीमय विळखा!, रस्त्यावर सांडपाणी, व्यापारी-नागरिक हैराण! ; रुग्णालय प्रशासन आणि बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा मुद्राळे यांचा संताप.

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात ड्रेनेजच्या टाक्या ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या या समस्येमुळे परिसरातील व्यापारी, पादचारी नागरिक तसेच रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णांना आरोग्यसेवा देणाऱ्या रुग्णालयाच्या परिसरातच अस्वच्छतेचा विळखा पडत असेल, तर सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणार कोण? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. या गंभीर समस्येची तातडीने दखल घेण्याची मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा मुद्राळे यांनी केली आहे.

रुग्णालयात उपचारासाठी यायचे की दुर्गंधीचा त्रास सहन करायचा?

उपजिल्हा रुग्णालयाच्या ड्रेनेजच्या टाक्या भरून त्यातील सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरून चालावे लागत असून, जवळील व्यापाऱ्यांनाही या अस्वच्छतेचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आधीच आजारपणामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना अशा वातावरणाचा सामना करावा लागत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.

गतवर्षी रुग्णांचे हाल; तेव्हा माणुसकीच्या नात्याने मुद्राळे यांनी उचलला होता खर्च!

गेल्या वर्षीही याच ड्रेनेज समस्येमुळे रुग्णालयातील संडास आणि बाथरूमच्या भांड्यांमध्ये सांडपाणी तुंबून ओव्हरफ्लो होण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी, रुग्णांना स्वच्छतागृहाचा वापर करताना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. रुग्णांची होणारी ही परवड पाहून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा मुद्राळे यांनी माणुसकीच्या नात्याने पुढाकार घेत स्वतःच्या खर्चाने ड्रेनेजच्या सर्व टाक्या साफ करून घेतल्या होत्या.

त्यानंतर या टाक्यांची आवश्यक डागडुजी करून त्यांची नियमित स्वच्छता राखण्याची जबाबदारी संबंधित बांधकाम विभागाची होती. मात्र, वारंवार तक्रारी करूनही या समस्येचे गांभीर्य लक्षात घेतले जात नसल्याची खंत मुद्राळे यांनी व्यक्त केली.

रुग्णांच्या हालअपेष्टा थांबवण्यासाठी प्रत्येक वेळी आम्हीच खर्च का करायचा?

“रुग्णांचे हाल होऊ नयेत, त्यांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे, या माणुसकीच्या भावनेतून आम्ही स्वतःच्या खिशातून खर्च करण्यास पुढे येतो. मात्र, जी कामे शासन आणि संबंधित यंत्रणांनी करणे अपेक्षित आहे, ती कामे आम्हालाच वारंवार स्वखर्चाने करावी लागत असतील, तर ही दुर्दैवी बाब आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून खर्च करण्यास आमची हरकत नाही; पण तो किती वेळा करायचा, यालाही काही मर्यादा असतात,” अशी परखड भावना रूपा मुद्राळे यांनी व्यक्त केली.

ICU मधील एसीचा प्रश्न अंशतः सुटला; खालच्या ICU कडे अद्याप दुर्लक्ष?

दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील (ICU) एसी बंद असल्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. सुमारे दोन महिन्यांपासून एसी बंद असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत होता. या समस्येबाबत पंधरा दिवसांपूर्वी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले होते. तसेच उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता.

या निवेदनानंतर चार दिवसांत ICU मधील काही एसी सुरू करण्यात आल्या; मात्र खालच्या ICU मधील एसी अद्यापही सुरू झालेल्या नसल्याचे रूपा मुद्राळे यांनी सांगितले. त्यामुळे या प्रश्नाचीही सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

लोकप्रतिनिधींनी आता तरी लक्ष घालावे!

सावंतवाडी शहरातील लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाने या समस्येकडे केवळ तात्पुरती डागडुजी म्हणून न पाहता कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. ड्रेनेजच्या टाक्यांची तातडीने स्वच्छता, आवश्यक दुरुस्ती आणि नियमित देखभालीची व्यवस्था करण्यात यावी. तसेच ICU मधील बंद एसीचा प्रश्नही तातडीने सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रुग्णालय हे रुग्णांना आरोग्य आणि दिलासा देणारे ठिकाण असते; मात्र त्याच परिसरात सांडपाण्याची दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत असेल, तर ही केवळ गैरसोय नसून सार्वजनिक आरोग्याशी निगडित गंभीर बाब आहे. त्यामुळे प्रशासनाने जागे होऊन तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून या प्रश्नासाठी पुढील भूमिका घेतली जाईल, असा स्पष्ट इशारा रूपा मुद्राळे यांनी दिला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles