वेंगुर्ला : विद्यार्थ्यांच्या अंगी केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून व्यावसायिक कौशल्ये विकसित व्हावीत आणि त्यांच्यात स्वयंरोजगाराची बीजे रुजावीत, या उद्देशाने वेंगुर्ला हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशिक्षणांतर्गत विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना गुलाबपाण्याच्या बाटल्या तयार करणे तसेच सुगंधी उटणे निर्मितीचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.

शाळेच्या सहाय्यक शिक्षिका श्रीम. एस. व्ही. शिंदे यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. वेंगुर्ला केंद्राचे केंद्रप्रमुख विश्वनाथ जगताप यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रसंगानुरूप राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांचे महत्त्व विशद केले. तसेच व्यवसाय शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी कौशल्ये, स्वावलंबनाची भावना आणि भविष्यात उपलब्ध होणाऱ्या संधी याविषयी मार्गदर्शन केले.

शाळेचे मुख्याध्यापक एस. ए. बिडकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शालेय वयातच विविध व्यावसायिक कौशल्ये आत्मसात केल्यास भविष्यात त्याचा निश्चितच लाभ होतो, असे प्रतिपादन केले. शाळेचे माजी मुख्याध्यापक मा. श्री. एस. एस. काळे यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे आणि उपक्रमातील सहभागाचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळाली. स्वतःच्या हातांनी विविध उत्पादने तयार करण्याचा आनंद अनुभवतानाच निर्मिती प्रक्रिया, कौशल्य आणि व्यवसायाभिमुख शिक्षण यांचीही ओळख विद्यार्थ्यांना झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजक शिक्षिका श्रीम. एस. व्ही. शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवर, विद्यार्थी आणि पालकांचे त्यांनी आभार मानले. आनंदी, उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात ही कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
पुस्तकी ज्ञानाला कृतीची जोड आणि शिक्षणाला कौशल्याची साथ देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने निश्चितच स्तुत्य ठरला!



