अखेर चिवारटेकडीचा अंधार दूर!, डुमिंग आल्मेडांच्या पुढाकाराला उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकरांची तत्पर साथ! ; नगरपालिकेकडून तातडीने स्ट्रीट लाईट सुरू, सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठा दिलासा.

सावंतवाडी : गेल्या काही काळापासून अंधाराच्या विळख्यात अडकलेल्या सावंतवाडी शहरातील लता डिमेलो पाणंद परिसरातील चिवारटेकडी अखेर विद्युत प्रकाशाने उजळून निघाली आहे. नागरिकांच्या वारंवार मागणीनंतरही प्रलंबित असलेल्या या समस्येला भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष डुमिंग आल्मेडा यांनी पुढाकार घेत वाचा फोडली, तर सावंतवाडी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी त्याची तातडीने दखल घेत प्रत्यक्ष कार्यवाही घडवून आणली.

चिवारटेकडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पथदीपांची सुविधा नसल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत होते. त्यातच ख्रिस्ती बांधवांचा सायबिण उत्सव सुरू असून, दिवाळीचा प्रकाशोत्सवही उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. अशा उत्सवी वातावरणात परिसरातील अंधार नागरिकांसाठी मोठी गैरसोय ठरत होता. विशेष म्हणजे, या भागात गवारेड्यांचा वाढता वावर असल्याने रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही रहिवाशांसाठी धोकादायक आणि चिंतेचा विषय बनले होते.

नागरिकांची ही व्यथा लक्षात घेऊन डुमिंग आल्मेडा यांनी केवळ तक्रारीपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष चिवारटेकडी परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची भेट घेत या गंभीर समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले. नागरिकांची सुरक्षितता, सण-उत्सवातील गैरसोय आणि परिसरातील वन्यप्राण्यांचा वाढता वावर या सर्व बाबींचे गांभीर्य त्यांनी निदर्शनास आणून दिले.

या मागणीची तत्पर दखल घेत ॲड. अनिल निरवडेकर यांनी नगरपालिका प्रशासनाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या निर्देशानंतर नगरपालिका प्रशासनाने चिवारटेकडी परिसरात नवीन स्ट्रीट लाईट बसवून परिसर प्रकाशमान केला. त्यामुळे अनेक दिवसांपासून अंधारात असलेल्या या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रश्न नागरिकांच्या सुरक्षिततेचा असेल, तर तत्परता हाच खरा लोकप्रतिनिधित्वाचा कस! डुमिंग आल्मेडा यांचा लोकहितासाठीचा पुढाकार आणि ॲड. अनिल निरवडेकर यांनी दाखविलेली प्रशासकीय तत्परता यामुळे चिवारटेकडीतील नागरिकांची महत्त्वाची समस्या मार्गी लागली आहे.

या कामाबद्दल परिसरातील रहिवाशांनी डुमिंग आल्मेडा आणि उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे. सणासुदीच्या काळात चिवारटेकडी प्रकाशाने उजळल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अंधार दूर झाला, नागरिकांचा दिलासा वाढला; लोकहितासाठीचा पुढाकार पुन्हा एकदा ठरला कामाचा!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles