सावंतवाडी : भारतीय परंपरेचा वारसा जपत संस्कृतीच्या मुळांना नव्या पिढीच्या उत्साहाचे कोंदण देणाऱ्या पिंपळेश्वर मित्र मंडळ, देऊळवाडी-बांदा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य नरकासुर स्पर्धेला भाजपचे राज्य युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते विशाल परब यांनी आवर्जून उपस्थिती लावली. नरकासुर स्पर्धेच्या निमित्ताने परिसरातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी मंडळाच्या वतीने विशाल परब यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, उपसभापती गौरव मुळीक, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, भाजपचे माजी शहराध्यक्ष बाबा काणेकर, निलेश ऊर्फ पापू कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना विशाल परब यांनी पिंपळेश्वर मित्र मंडळाच्या कार्याचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “पिंपळेश्वर मित्र मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत सुंदर आणि नियोजनबद्ध पद्धतीने नरकासुर स्पर्धेचे आयोजन करत आहे. अशा उपक्रमांमधून युवकांना एकत्र आणण्याबरोबरच आपल्या समृद्ध कला, संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मंडळ करीत आहे. आजच्या बदलत्या काळात नव्या पिढीला आपल्या सांस्कृतिक वारशाशी जोडून ठेवणारे असे उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत. मंडळाने भविष्यातही विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करावे. या विधायक कार्यासाठी आपण मंडळाच्या पाठीशी ठामपणे उभे असून, सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत.”
दरम्यान, बांदा परिसरातील सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने भाजपच्या वतीने लवकरच एका भव्य-दिव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणाही विशाल परब यांनी यावेळी केली. त्यामुळे बांदा परिसरातील सांस्कृतिक रसिकांसाठी आगामी काळात मनोरंजनाची एक पर्वणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, विशाल परब हे दरवर्षी पिंपळेश्वर मित्र मंडळाच्या विविध कार्यक्रमांना आवर्जून उपस्थिती लावतात. मंडळाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना ते सातत्याने सहकार्य करीत आले आहेत. त्यांच्या या सहकार्यामुळे मंडळाच्या कार्याला प्रोत्साहन मिळत असल्याची भावना व्यक्त करीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष आभार मानले.
नरकासुर स्पर्धा म्हणजे केवळ आकर्षक प्रतिकृतींचे प्रदर्शन नव्हे, तर युवकांच्या कल्पकतेला, कलागुणांना आणि संघटनशक्तीला मिळणारे हक्काचे व्यासपीठ आहे. अशा उपक्रमांतून सांस्कृतिक परंपरेचा दीप नव्या पिढीच्या हातात सुपूर्द करण्याचे कार्य पिंपळेश्वर मित्र मंडळ करीत असल्याने या उपक्रमाचे परिसरातून सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावळाराम शिरोडकर यांनी केले, तर राकेश परब यांनी उपस्थितांचे आभार मानले.



