म्हापण :येथील चव्हाणवाडीचे रहिवासी आणि म्हापण गावचे पोलीस पाटील दादू सुरेश म्हापणकर हे गेल्या तीन महिन्यांपासून ( मेलिओइडोसिस) या दुर्मिळ आजाराशी झुंज देत आहेत. समुद्रात कर्तव्य बजावत असताना विषारी कीटकाचा दंश झाल्याने त्यांची प्रकृती खालावली असून, सध्या गोवा येथील बांबोळी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचारांचा खर्च मोठा असल्याने म्हापणकर कुटुंबीय आर्थिक अडचणीत सापडले असून, त्यांच्या उपचारांसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
दादू म्हापणकर हे म्हापण गावात पोलीस पाटील म्हणून जबाबदारी सांभाळत असून, यापूर्वी ते समुद्रात जाऊन मासेमारीही करत होते. जून महिन्याच्या सुमारास पोलीस पाटील म्हणून कर्तव्य बजावत असताना समुद्रात आढळलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी ते समुद्रात उतरले होते. याचवेळी रात्रीच्या अंधारात त्यांना समुद्रातील एका विषारी कीटकाचा दंश झाला. मात्र, रात्रीची वेळ असल्याने त्यांना याची जाणीव झाली नाही. दुसऱ्या दिवशी सुरुवातीला त्यांची प्रकृती सामान्य होती. मात्र, त्यानंतर हळूहळू त्यांच्या प्रकृतीत बिघाड होऊ लागला.
खोकला, ताप तसेच हात-पाय बारीक होणे अशा त्रासांमुळे त्यांना कुडाळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर त्यांना क्षयरोग (टीबी) असल्याचे निदान झाले आणि त्यानुसार उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारांनंतरही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने पुन्हा तपासण्या करण्यात आल्या. यावेळी त्यांना मधुमेह असल्याचेही निदान झाले. जवळपास तीन महिने विविध उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने अखेर त्यांना गोवा येथील बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बांबोळी रुग्णालयात विविध वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर त्यांच्या आजाराचे नेमके स्वरूप स्पष्ट झाले. विषारी कीटकाच्या दंशामुळे त्यांना( मेलिओइडोसिस) हा दुर्मिळ आजार झाल्याचे निदान करण्यात आले. सध्या त्यांच्या उपचारासाठी दररोज ७ हजार ५०० रुपये किमतीची तीन इंजेक्शन्स द्यावी लागत आहेत. पुढील २१ दिवस हे उपचार सुरू ठेवावे लागणार असून, औषधोपचारांचाही खर्च मोठा आहे. याशिवाय पायाच्या हाडामध्ये आजाराशी संबंधित घटक असल्याने त्यावर शस्त्रक्रिया करण्याची तयारी सुरू आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारेल, अशी आशा कुटुंबीयांना आहे.
शासकीय योजनांचा लाभही नाही!
दादू म्हापणकर यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले असून, आई मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. तर भाऊ खासगी नोकरी करून कुटुंबाला हातभार लावतो. आतापर्यंत त्यांच्या उपचारांवर सुमारे चार लाख रुपये खर्च झाले आहेत. मात्र, हा आजार दुर्मिळ स्वरूपाचा असल्याने महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत उपचारांचा समावेश होत नसल्याची अडचण निर्माण झाली आहे.
एकीकडे(मेलिओइडोसिस) दुर्मिळ आजाराशी सुरू असलेली झुंज आणि दुसरीकडे दिवसेंदिवस वाढणारा उपचारांचा खर्च, अशा दुहेरी संकटात म्हापणकर कुटुंब सापडले आहे. अशा परिस्थितीत दादू म्हापणकर यांना पुन्हा निरोगी आयुष्य जगता यावे, यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी शक्य तेवढी आर्थिक मदत करावी, असे कळकळीचे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
मदतीसाठी GPay क्रमांक : ९४०३०५९८८१
किंवा
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा केळूस,
नाव: दादू सुरेश म्हापणकर,
A/C No.33438495876
IFSC code: SBIN0007490
आपली छोटीशी मदतही दादू म्हापणकर यांच्या उपचारांसाठी मोलाची ठरू शकते. माणुसकीच्या भावनेतून मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.



