कोकणातील लेकरांच्या स्वप्नांना मिळणार ‘जिजाऊ’चे बळ!, दोडामार्गातील सात शाळांमध्ये ज्ञानदानाचा अनोखा सोहळा. ; निलेश सांबरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ लाख वह्यांचे होणार वितरण!

दोडामार्ग : शिक्षणाच्या वाटेवर संघर्ष करणाऱ्या ग्रामीण भागातील चिमुकल्या हातांना नव्या वह्यांची साथ मिळाली आणि त्यांच्या निरागस चेहऱ्यांवर आनंदाचे हजारो दिवे उजळले! परिस्थितीच्या मर्यादांनी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना कधीही खीळ बसू नये, या उदात्त भावनेतून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र आणि जिजाऊ संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राबविण्यात येणारा ३५ लाख मोफत वह्या वाटपाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम दोडामार्ग तालुक्यात उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील सात शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.

केवळ वह्यांचे वाटप नव्हे, तर हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना बळ देणारा आणि त्यांच्या भविष्याच्या पानांवर आशेची नवी अक्षरे उमटविणारा हा उपक्रम ठरला. जिजाऊ संघटना, सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

सात शाळांमध्ये ज्ञानाचा आनंदोत्सव!

दोडामार्ग तालुक्यातील माध्यमिक विद्यालय, झोळंबे; समाजसेवा हायस्कूल, कोलझर; नूतन विद्यालय, कळणे; सरस्वती विद्यामंदिर, कुडासे; माध्यमिक विद्यालय, झरेबांबर; बापूसाहेब देसाई विद्यालय, उसाप आणि श्री शांतादुर्गा एम. व्ही. पिकुले विद्यालय या सात शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

सकाळी १०.४५ वाजता झोळंबे येथून या उपक्रमाचा शुभारंभ झाला, तर दुपारी ४.३० वाजता पिकुले विद्यालयात या उपक्रमाची सांगता झाली. दिवसभर विविध शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत वह्यांचे वितरण करण्यात आले. नव्या कोऱ्या वह्या हातात पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि त्यांच्या डोळ्यांतील चमक या सामाजिक उपक्रमाचे खरे यश अधोरेखित करणारी ठरली.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार मिळणे ही काळाची गरज असून, जिजाऊ संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत हाती घेतलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

निलेश सांबरे यांचा शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तनाचा ध्यास!

या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.

ते म्हणाले, “कोकणातील प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत मोठी स्वप्ने आहेत; मात्र या स्वप्नांच्या पूर्ततेच्या मार्गावर अनेकदा आर्थिक परिस्थितीची अडचण उभी राहते. केवळ वहीअभावी एकही विद्यार्थी शिक्षणापासून मागे राहता कामा नये, हीच जिजाऊची ठाम भूमिका आहे. आजचा विद्यार्थी हाच उद्याचा अधिकारी, नेता आणि कोकणच्या उज्ज्वल भविष्याचा शिल्पकार आहे. कोकणातील मुलांनी मोठी स्वप्ने पाहावीत, जिद्द आणि कष्टाच्या जोरावर ती पूर्ण करावीत आणि अधिकारी बनून आपल्या मातीचे नाव उज्ज्वल करावे, हेच जिजाऊचे ध्येय आहे. स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीशी जिजाऊ संस्था ठामपणे आणि कायम उभी राहील, हा माझा शब्द आहे.”

सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५ लाख वह्यांची ज्ञानभेट!

संपूर्ण कोकणात ३५ लाख मोफत वह्या वाटप करण्याच्या व्यापक संकल्पाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात निलेश सांबरे यांच्या माध्यमातून तब्बल ५ लाख वह्यांचे वितरण करण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसांत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने हा उपक्रम राबविण्यात येणार असून, हजारो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.

जिजाऊ संघटनेचे सुदर्शन पाटील यांनी ही माहिती दिली. शिक्षणाच्या प्रवाहात प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळावी आणि आर्थिक अडचणींमुळे कोणाचेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या उपक्रमाला जिजाऊ संघटनेचे सुदर्शन पाटील, वैभव मसणे, ओमकार तिवरेकर, ज्ञानेश्वर नेवरेकर यांच्यासह कोलझरचे सरपंच सुरेंद्र सावंत-भोसले, झोळंबेचे उपसरपंच विनायक गाडगीळ, प्रकाश गवस, दिलखुश देसाई, अप्पा देसाई, समीर गवस, सुजल गवस, विष्णू नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

एका वहीतून उमलणारे स्वप्न, उद्याच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरू शकते! शिक्षणाच्या या पवित्र वाटेवर विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून जिजाऊ संस्थेने सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे. वह्यांच्या प्रत्येक पानावर ज्ञानाची अक्षरे उमटतील आणि त्याच अक्षरांतून उद्याचा सक्षम, सुशिक्षित आणि स्वाभिमानी कोकण घडेल, अशी आशा या उपक्रमातून व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles