पेट्रोल-डिझेलच्या दरात जगभरात घसरण. ; भारतातही इंधन स्वस्त होणार?

नवी दिल्ली : पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतीत काही प्रमाणात घट झाली आहे. श्रीलंका, बांगलादेश, चीन, अमेरिका आणि नेपाळमध्येही इंधनाचे दर कमी झाले आहेत. यानंतर, भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता किती? असा प्रश्न साहजिकपणे पडलाच आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार इंधनदर स्थिर ठेवणार की सर्वसामान्यांना दिलासा देणार, याकडे आता लक्ष लागले आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत सध्या मोठी चर्चा सुरू आहे. मे 2026 मध्ये सरकारी तेल कंपन्यांनी चार टप्प्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 7.50 रुपयांची वाढ केली होती. विशेष म्हणजे, याआधी कच्च्या तेलाच्या किमती वाढत असतानाही निवडणुकांच्या काळात देशांतर्गत इंधनदरात फारसा बदल करण्यात आला नव्हता. आता उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मागील राजकीय आणि आर्थिक घडामोडींचा विचार करता, निवडणुकांपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

इतर देशांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी –

पश्चिम आशियातील संघर्षामुळे जगभरातील इंधन बाजारावर मोठा परिणाम झाला. युद्ध सुरू झाल्यानंतर अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या. मात्र, आता काही देशांमध्ये दरवाढीचा वेग कमी झाला असून काही ठिकाणी किमती घसरू लागल्या आहेत. म्यानमारमध्ये पेट्रोलच्या किमती युद्ध सुरू झाल्यापासून 74.8 टक्क्यांनी वाढल्या आहेत. एकेकाळी ही वाढ जवळपास दुप्पट झाली होती. डिझेलच्या किमतीतही 77.6 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) पेट्रोलचे दर एका टप्प्यावर 83.7 टक्क्यांनी वाढले होते. आता ही वाढ कमी होऊन 73.4 टक्क्यांवर आली आहे. डिझेलच्या बाबतीतही सुरुवातीला 90.50 टक्क्यांपर्यंत पोहोचलेली दरवाढ आता 88.5 टक्क्यांवर आली आहे पाकिस्तानमध्येही इंधनदरात काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पेट्रोलच्या किमतीतील वाढ 46.9 टक्क्यांवरून 25.9 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. तर डिझेलच्या दरातील वाढ 43.6 टक्क्यांवरून 29.9 टक्क्यांवर आली आहे.

श्रीलंका, बांगलादेश, चीन, अमेरिका आणि नेपाळमध्येही पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट झाल्याचे चित्र आहे. मात्र, उपलब्ध तुलनात्मक आकडेवारीनुसार, या देशांतील इंधनदर भारतापेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

भारतात इंधनदरात तुलनेने कमी वाढ का?

जगातील अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली असताना भारतात ही वाढ तुलनेने मर्यादित राहिली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून भारतात इंधनदरात सुमारे 8.50 टक्क्यांचीच वाढ झाल्याचा दावा केला जात आहे. यामागे सरकार आणि तेल कंपन्यांची भूमिका महत्त्वाची आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा संपूर्ण भार ग्राहकांवर न टाकता त्यातील मोठा आर्थिक फटका सरकार आणि तेल कंपन्या सहन करत असल्याचे सांगितले जाते.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनीही याबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. पश्चिम आशियातील संघर्ष आणि पेट्रोलियम पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे तेल कंपन्यांना सुमारे 42 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यापूर्वी तेल कंपन्यांना झालेल्या नुकसानीचा आढावा घेणे आवश्यक असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles