सावंतवाडी : नेतृत्व, संघटनात्मक बांधिलकी आणि नव्या संकल्पांचा उत्साह अशा प्रेरणादायी वातावरणात जेसीआय सावंतवाडी चॅप्टरची २०२६ ची परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेत जेसीआय सावंतवाडीच्या आगामी २०२७ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
यामध्ये अध्यक्षपदी जेसी ॲड. समीर वंजारी, सचिवपदी जेसी मंजिरी केसरकर, तर खजिनदारपदी जेसी कौस्तुभ नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे.
नवीन नेतृत्वाच्या माध्यमातून जेसीआय सावंतवाडीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि नेतृत्व विकासाच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नव्या संधींचे स्वागत करत संघभावना, सेवाभाव आणि प्रभावी नेतृत्वाच्या बळावर संघटनेला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेण्याचा संकल्प या निवडीच्या निमित्ताने व्यक्त होत आहे.
या परिषदेला जेसीआय सावंतवाडीचे PR डायरेक्टर जेसी सागर चव्हाण यांचीही उपस्थिती होती. त्यांनी या महत्त्वपूर्ण संघटनात्मक कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
या निवड प्रक्रियेत नामांकन समितीचे अध्यक्ष जेएफडी सुशांत गोवेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच विद्यमान अध्यक्षा जेएफएम श्रद्धा गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली वर्षभरात झालेल्या कार्याचा आणि संघटनात्मक योगदानाचा गौरव करण्यात आला.
नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. समीर वंजारी, सचिव मंजिरी केसरकर आणि खजिनदार कौस्तुभ नार्वेकर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जेसीआय सावंतवाडी नवी भरारी घेईल आणि समाजहिताच्या कार्यात मोलाचे योगदान देईल, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.



