सावंतवाडी : आडाळी औद्योगिक क्षेत्रात उद्योगविश्वाची नवी पहाट उगवत असताना, उद्योजकांच्या वाटेतील प्रशासकीय अडथळे दूर करून उद्योग उभारणीच्या प्रक्रियेला अधिक गती देण्यासाठी आता विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रशासकीय प्रक्रिया, महामंडळाच्या ऑनलाइन व ऑफलाइन कार्यपद्धती तसेच परवानग्यांबाबतची सविस्तर माहिती उद्योजकांना एकाच छताखाली उपलब्ध व्हावी, यासाठी आडाळी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या समवेत आडाळीचे सरपंच पराग गावकर, प्रशांत जाधव आणि बाबा धुरी यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन सादर केले.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कार्यतत्परतेमुळे आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्नांना आता मार्ग मिळत असून, गेल्या वर्षभरापासून रखडलेले भूखंड वाटप आणि अन्य प्रशासकीय प्रक्रिया अलीकडच्या काळात मार्गी लागल्या आहेत. या सकारात्मक घडामोडींमुळे तब्बल ६० हून अधिक उद्योजकांनी आडाळीत उद्योग उभारणीच्या दिशेने प्रत्यक्ष पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या औद्योगिक क्षेत्रात रोजगारनिर्मिती आणि स्थानिक आर्थिक विकासाच्या नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मात्र, उद्योग उभारणीच्या पुढील टप्प्यात प्रशासकीय प्रक्रियांची गुंतागुंत उद्योजकांसमोर आव्हान बनत आहे. आडाळीतील बहुतांश भूखंडधारक उद्योजक हे गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून, उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या महामंडळाच्या विविध ऑनलाइन व ऑफलाइन प्रक्रियांची पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने त्यांना वारंवार वेळ खर्च करावा लागत आहे. परिणामी, प्रत्यक्ष उद्योग उभारणीच्या कामाला अपेक्षित गती मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केल्यास उद्योजकांना आवश्यक कागदपत्रे, परवानग्या, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, ऑफलाइन कार्यपद्धती आणि प्रशासकीय पूर्ततेबाबत थेट मार्गदर्शन मिळू शकेल. एकाच ठिकाणी सर्व शंकांचे निरसन आणि प्रक्रियांची स्पष्ट माहिती उपलब्ध झाल्यास उद्योजकांचा वेळ, श्रम आणि अनावश्यक प्रशासकीय फेऱ्या वाचतील. त्याचबरोबर उद्योग उभारणीला गती मिळून महामंडळाच्या कामकाजाबाबतही विश्वासार्हता आणि सकारात्मकता निर्माण होईल.
आडाळी औद्योगिक क्षेत्र हे केवळ भूखंडांचे औद्योगिक संकुल न राहता, भविष्यात रोजगारनिर्मितीचे आणि कोकणच्या आर्थिक प्रगतीचे महत्त्वपूर्ण केंद्र बनावे, यासाठी उद्योजकांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशासकीय सहकार्य मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित प्रशासनाला विशेष मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रुप ग्रामपंचायत आडाळी आणि आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास समिती पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. आता उद्योगमंत्री उदय सामंत या मागणीला कसा प्रतिसाद देतात आणि आडाळीच्या औद्योगिक विकासाला या उपक्रमातून कितपत गती मिळते, याकडे उद्योजकांचे लक्ष लागले आहे.



