सावंतवाडी : आपल्या शब्दसामर्थ्याने, भावस्पर्शी काव्यलेखनाने आणि वृत्तबद्ध कवितांच्या अनोख्या अभिव्यक्तीने साहित्यरसिकांच्या मनात स्थान निर्माण करणारे सावंतवाडीतील कवी तथा कोमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष दीपक पटेकर (दीपी) यांच्या ‘बकुळीची फुले’ या काव्यसंग्रहाला पुण्यातील प्रतिष्ठेचा ‘श्रि. दा. ग्रंथ पुरस्कार’ जाहीर झाला आहे. येत्या १२ डिसेंबर २०२६ रोजी पुणे येथे एका समारंभात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ‘बकुळीची फुले’ या वृत्तबद्ध काव्यसंग्रहाने यापूर्वीही एका पुरस्कारावर आपले नाव कोरले असून, हा त्याला प्राप्त झालेला दुसरा सन्मान आहे.

साहित्याच्या प्रांगणात शब्दांना जेव्हा संवेदनांची किनार लाभते आणि कवितेतून जीवनाचे प्रतिबिंब उमटते, तेव्हा त्या साहित्यकृतीचा प्रवास वाचकांच्या मनापासून पुरस्काराच्या व्यासपीठापर्यंत पोहोचतो. ‘बकुळीची फुले’ या काव्यसंग्रहाच्या बाबतीतही हेच घडले आहे. आपल्या आशयघन रचना, वृत्तबद्ध काव्यशैली आणि भावभावनांची सुंदर गुंफण यांमुळे या संग्रहाने साहित्यविश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजमनाला विचारप्रवृत्त करणारे, संवेदनशीलता जागवणारे आणि समाजाला विधायक दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे, या उदात्त विचारातून ‘श्रि. दा. ग्रंथ पुरस्कार’ उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. यंदाच्या पुरस्कार स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनुवादित, शैक्षणिक, कथासंग्रह, कवितासंग्रह, कादंबरी, नाटक, चरित्र, वैचारिक, ललित, प्रवासवर्णन आणि बालसाहित्य अशा विविध साहित्यप्रकारांतील अनेक दर्जेदार ग्रंथ स्पर्धेसाठी प्राप्त झाले होते.
प्राप्त झालेल्या ग्रंथांचा साहित्यिक दर्जा, आशयाची समृद्धता आणि अभिव्यक्तीची विविधता लक्षात घेता सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींची निवड करणे परीक्षक मंडळासाठी मोठे आव्हान ठरले. परीक्षकांनी प्रत्येक ग्रंथाचे बारकाईने व अभ्यासपूर्ण परीक्षण करून भाषाशैली, आशयघनता, मांडणी आणि समाजावर होणारा सकारात्मक परिणाम अशा विविध निकषांच्या आधारे पुरस्कारार्थी साहित्यकृतींची निवड केली.
या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने ‘बकुळीची फुले’च्या साहित्यिक सुगंधाला पुण्याच्या सांस्कृतिक नगरीत मानाची दाद मिळाली आहे. एका कवीच्या प्रतिभेला मिळालेली ही पावती तर आहेच; शिवाय सावंतवाडीच्या साहित्यपरंपरेचा गौरव वाढवणारी अभिमानास्पद घटना आहे.
दीपक पटेकर (दीपी) यांच्या या उल्लेखनीय साहित्यिक यशाबद्दल साहित्यिक, कवी, लेखक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या लेखणीतील बकुळीचा हा सुगंध असाच दरवळत राहो आणि मराठी साहित्यविश्वात त्यांच्या प्रतिभेचा दरवळ अधिकाधिक विस्तारत जावो, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.



