सावंतवाडी : कोकणच्या विकासाचा प्रश्न केवळ आश्वासनांच्या चौकटीत न राहता, तो प्रत्यक्ष कृतीच्या पटलावर उतरावा आणि तळकोकणाच्या सर्वांगीण प्रगतीला विकासाची नवी गती मिळावी, या दूरदृष्टीतून भाजपाचे राज्य युवा नेते विशाल परब यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची सावंतवाडी येथे सदिच्छा भेट घेत त्यांनी कोकणच्या विकासासाठी विशेष कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन) तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आग्रही विनंती केली.
या सदिच्छा भेटीदरम्यान विशाल परब यांनी ॲड. राहुल नार्वेकर यांना अखंड विश्वाचे आराध्य दैवत, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा सस्नेह भेट देत आगामी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीला केवळ औपचारिकतेचे स्वरूप न ठेवता कोकणच्या विकासाचे महत्त्वपूर्ण मुद्दे मांडत त्यांनी स्थानिक जनतेच्या अपेक्षांना व्यासपीठ मिळवून दिले.
आरोग्य, शिक्षण, उद्योग अन् कृषी क्षेत्राला विकासाची नवी झेप!
तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकण विभागाच्या विकासासाठी आरोग्य, शैक्षणिक, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रात नियोजनबद्ध पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे विशाल परब यांनी यावेळी अधोरेखित केले. कोकणातील नैसर्गिक संपत्ती, पर्यटन क्षमता, कृषी उत्पादन आणि स्थानिक मनुष्यबळ यांचा योग्य समन्वय साधून विकासाच्या नव्या संधी निर्माण करता येतील. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून विशेष निधी, योजना आणि दीर्घकालीन विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नार्वेकरांचा सकारात्मक प्रतिसाद; कोकणच्या विकासासाठी विशेष प्रयत्नांचे आश्वासन!
विशाल परब यांनी मांडलेल्या विकासात्मक मागणीची ॲड. राहुल नार्वेकर यांनी सकारात्मक दखल घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातील. आगामी काळात कोकणच्या गरजा आणि विकासाच्या संधी लक्षात घेऊन विशेष ॲक्शन प्लॅन तयार करून त्याच्या अंमलबजावणीसाठी आपण निश्चितच प्रयत्नशील राहू, असा सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिला.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तळकोकणाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान, कोकणच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल विशाल परब यांनी ॲड. राहुल नार्वेकर यांचे आभार मानले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी दिलीप भालेकर, सोशल मीडिया सेलचे प्रमुख केतन आजगावकर, ओंकार पावसकर, साईप्रसाद भोई, धीरेंद्र म्हापसेकर, प्रशांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कोकणच्या विकासाचा ध्यास, स्थानिक प्रश्नांची जाण आणि शासनदरबारी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका, यातून विशाल परब यांनी या भेटीच्या माध्यमातून विकासाभिमुख नेतृत्वाची दिशा अधोरेखित केली आहे. आता या सकारात्मक चर्चेचे रूपांतर प्रत्यक्ष विकासकामांत कधी होते, याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.



