सावंतवाडी :राजकारणाच्या रणांगणात प्रतिस्पर्धी असले, तरी सामाजिक आणि सांस्कृतिक सोहळ्यांच्या पवित्र भूमीत माणुसकीचा सुगंध दरवळत राहावा, याची प्रचिती आज सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीच्या जत्रोत्सवात आली. भारतीय जनता पार्टीचे राज्य युवा नेते विशाल परब यांनी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांना सस्नेह नमस्कार करीत आपल्या संस्कारशील व्यक्तिमत्त्वाची पुन्हा एकदा झलक दाखवून दिली. त्यांच्या या सहज, सुसंस्कृत आणि मन जिंकणाऱ्या कृतीने उपस्थितांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली, तर जत्रोत्सवाच्या परिसरात विशाल परब यांच्या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाची चर्चा रंगू लागली.
दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीच्या जत्रोत्सवाला आज भक्ती, श्रद्धा आणि संस्कृतीचा अनोखा रंग चढला होता. माऊलीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली असतानाच भाजपाचे राज्य युवा नेते विशाल परब यांनी जत्रोत्सवाला भेट देत श्रीदेवी माऊलीचे मनोभावे दर्शन घेतले. माऊलीच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी भक्तिभावाने आशीर्वाद घेतले.
दरम्यान, या पवित्र सोहळ्यात माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनीही उपस्थिती दर्शविली. राजकीय क्षेत्रात एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दोन नेत्यांची जत्रोत्सवाच्या निमित्ताने समोरासमोर भेट झाली. मात्र, त्या क्षणी राजकीय समीकरणांपेक्षा संस्कारांचे नाते अधिक प्रभावी ठरले.
आमदार दीपक केसरकर समोर येताच विशाल परब यांनी कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता त्यांना अत्यंत स्नेहपूर्वक नमस्कार केला. त्यांच्या या कृतीतून ज्येष्ठांविषयीचा आदर, सामाजिक सौजन्य आणि संस्कारांची श्रीमंती सहजपणे व्यक्त झाली. प्रतिस्पर्धी असला म्हणून सन्मान कमी होत नाही, तर संस्कार असले की नम्रता आपोआप व्यक्त होते, याचा जणू प्रत्ययच उपस्थितांना आला.
विशाल परब यांच्या या संस्कारशील वर्तनाने उपस्थितांची मने जिंकली. राजकारणात मतभेद असू शकतात, विचारांची लढाई असू शकते; मात्र माणुसकीच्या नात्याला त्याची बाधा होऊ नये, हा संदेश त्यांच्या कृतीतून अधोरेखित झाला. कोणताही गाजावाजा नाही, दिखाऊपणा नाही; केवळ सहज व्यक्त झालेला आदर आणि स्नेह!
राजकीय प्रतिस्पर्ध्यालाही सन्मानाने अभिवादन करण्याची ही वृत्ती म्हणजे विशाल परब यांच्या व्यक्तिमत्त्वातील संस्कारांची खरी ओळख!
सोनुर्लीच्या जत्रोत्सवात माऊलीच्या दर्शनासोबतच विशाल परब यांच्या या कृतीनेही उपस्थितांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. जत्रेच्या गर्दीत भक्तीचा गजर सुरू असतानाच त्यांच्या नम्रतेची आणि सौजन्याची चर्चा सर्वत्र रंगली.
राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात, पदे आणि प्रतिष्ठेची स्पर्धा सुरू असते; पण या सगळ्यांच्या पलीकडे माणुसकीचा धागा जपणारे नेतृत्वच जनमानसात वेगळी छाप उमटवते. सोनुर्लीच्या पवित्र भूमीत विशाल परब यांनी आपल्या कृतीतून हाच संस्कारांचा संदेश दिला.
प्रतिस्पर्ध्याला नमस्कार, ज्येष्ठांना सन्मान आणि माणुसकीला सर्वोच्च स्थान… विशाल परबांच्या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाची ओळख सोनुर्लीच्या जत्रेत पुन्हा एकदा अधोरेखित झाली!



