सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री पंचम खेमराज महाविद्यालय (स्वायत्त) सावंतवाडी येथे सावंतवाडी संस्थांनचे भूतपूर्व अधिपती पुण्यश्लोक श्रीमंत बापूसाहेब महाराज यांचा राज्याभिषेक दिन महाविद्यालयामध्ये साजरा करण्यात आला.
29 आॅक्टोबर 1924 मध्ये बापूसाहेब महाराजांचा राज्याभिषेक झाला. तेव्हा सावंतवाडी संस्थानाला पूर्ण अधिकारानीशी राजा मिळाला. याला आता 100 वर्षे पुर्ण झाली.
श्रीमंत बापुसाहेब महाराजांनी आपल्या 13 वर्षाच्या अल्पशा कारकीर्दीमध्ये लोकाभिमुख तसेच जनसेवेचे कार्य केले, यामध्ये शिक्षण ,आरोग्य, सहकार , अंतर्गत रस्ते, शेती सुधारणा इत्यादी बाबींवर भर दिला. शिक्षणाची सोय दुर्गम भागामध्ये निर्माण केली. त्यामुळे जनतेमध्ये उत्साह निर्माण झाला.
याच कालावधीमध्ये सावंतवाडीत मलेरियाची साथ आली होती. योग्य नियोजन करून या साथीवर मात केली. सावंतवाडी संस्थानातील जनता आजही बापूसाहेबांच्या आठवणी मध्ये रमत असते .
या दिनाची आठवण म्हणून श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये बापूसाहेब महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून त्यांच्या कार्याची आठवण करण्यात आली. याप्रसंगी सिधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले, संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, संस्थेचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत, संस्थेचे संचालक प्रा.डी.टी.देसाई, सहाय्यक संचालक अॅड.शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, लाॅ काॅलेजच्या प्राचार्या डाॅ. अश्विनी लेले, मदर क्विन्सच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगांवकर, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डाॅ. बी. एन. हिरामणी यांनी केले. त्यांनी बापूसाहेब महाराजांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेतला. महात्मा गांधीजीनी ज्यांना ‘रामराजा’ असे संबोधले. त्या राजाचे जनतेप्रती असलेले प्रेम याठिकाणी प्रकर्षाने जाणवते व जनतेच्या उत्कर्षासाठी त्यांनी राबविलेल्या विविध योजना आजच्या राज्यकर्त्यांसाठी आदर्श ठराव्या अशाच आहेत असे ते म्हणाले.