मालगुंड : महाराष्ट्रात अग्रगण्य असणार्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारे सन 2022-23 चे वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार नुकतेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी जाहीर केले. दरवर्षी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कारासाठी विहित कालावधीतील प्रकाशित पुस्तकांचे प्रस्ताव मागितले जातात. सर्व प्रस्तावाची छाननी होऊन त्यानुसार आलेल्या साहित्य प्रकाराचे त्या-त्या क्षेत्रातील नामवंत मान्यवर परिक्षकाकडून परीक्षण केले जाते. त्यानंतर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुरस्कार जाहीर केले जातात. त्यानुसार हे पुरस्कार जाहीर केले आहेत.
कादंबरी विभागात प्रथम क्रमांकाचा र.वा.दिघे स्मृती पुरस्कार श्री. प्रकाश हरिश्चंद्र पाटील यांच्या ‘काश्मीर कनेक्शन’ या कादंबरीला तर द्वितीय क्रमांकाचा वि. वा. हडप स्मृती पुरस्कार श्री. नागू वीरकर लिखित ‘हेडाम’ कादंबरीसाठी, कथा विभागात प्रथम क्रमांकाचा वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार श्री. मनोज नाईक साटम यांच्या ‘त्या वळणावर’ तर द्वितीय क्रमांकाचा विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार दत्तात्रय सैतवडेकर यांच्या ‘ब्रेकिंग न्यूज’ कथासंग्रहाला, कविता विभागात प्रथम क्रमांकाचा आरती प्रभू स्मृती पुरस्कार राजीव जोशी यांच्या ‘शतकोत्तरी ओरखडा’, तर द्वितीय क्रमांकाचा वसंत सावंत स्मृती पुरस्कार रेश्मा राणे जाधव यांच्या ‘एका सावलीचा शोध’ या कवितासंग्रहाला, आत्मचरित्र विभागात प्रथम क्रमांकाचा धनंजय कीर स्मृति पुरस्कार श्री. अशोक बेंडखळे यांच्या ‘महाराणी येसूबाई’ या संग्रहास, चरित्र विभागात श्रीकांत शेट्ये स्मृती पुरस्कार डॉ. स्मिता दातार यांच्या ‘फक्त तिच्यासाठी’ या चरित्रास, समीक्षा विभागात प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार डॉ. सोमनाथ कदम यांच्या ‘प्रागतिक चळवळीचे प्रवर्तक’ या ग्रंथास, नाटक विभागाचा भाई भगत पुरस्कार डॉ.सुभाष कटकदौंड यांच्या ‘पुन्हा एकदा नव्याने जगायचंय मला’ या नाटकास, तर ललित गद्य विभागातील प्रथम क्रमांकाचा अनंत काणेकर स्मृती पुरस्कार निर्मला रणजित शेवाळे यांच्या ‘करंजमाळ’ या ग्रंथास तर द्वितीय क्रमांकाचा सौ. लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे पुरस्कार डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्या ‘एक पाती गवताची’ या ललित ग्रंथास, बालवाङमय विभागाचा प्र.श्री.नेरुरकर स्मृती पुरस्कार स्टॅनली गोन्सालवीस यांच्या ‘मुलांचे गांधी अंकल आणि इतर कथा’ या ग्रंथास, संकीर्ण विभागातील प्रथम क्रमांकाचा वि.कृ.नेरुरकर स्मृती पुरस्कार रमेश धनावडे यांच्या ‘कवितेच्या सुरातून’ यास, तर द्वितीय क्रमांकाचा अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार सुखद राणे यांच्या ‘इथे देशीचे’ या ग्रंथास आणि वैचारिक विभागासाठीचा फादर स्टीफन सुवार्ता पुरस्कार डॉ. आशुतोष रावीकर यांच्या ‘भारताचे परकीय’ या ग्रंथास मिळाला आहे. तर कोकण मराठी साहित्य परिषदेचे संपादन, कथासंग्रह, कादंबरी विभागातील विशेष पुरस्कार अनुक्रमे ‘मराठी सातासमुद्रापार’ यासाठी मेघना साने, ‘केमिस्ट्री’ कथासंग्रहासाठी रामदास खरे आणि ‘शेवटची लिओग्राफि’ या कादंबरीसाठी डॉ. बाळासाहेब लबडे यांना जाहीर झाले आहेत.
यासोबतच वाड्मयेतर पुरस्कारांमध्ये पालघर व ठाणे जिल्ह्यात साहित्य, पर्यावरण, शिक्षण, आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या व्यक्तींना दिला जाणारा कै. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार नूतन बालशिक्षण संघाचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावसकर यांना तर संपूर्ण कोकणात साहित्य, पर्यावरण, शिक्षण क्षेत्रात योगदान देणार्या व्यक्तीला देण्यात येणारा श्री. बा. कारखानीस पुरस्कार प्रेमसागर गजानन मेस्त्री यांना, गुरुवर्य अ. आ. देसाई स्मृती कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार सिंधुदुर्ग मधील मालवण शाखेचे गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर यांना, राजा राजवाडे स्मृती वाड्मयीन कार्यकर्ता पुरस्कार मुंबईतील पार्ले शाखेचे अध्यक्ष संतोष खाडये व दादर शाखेच्या अध्यक्षा विद्या प्रभू यांना, वामनराव दाते स्मृती उत्कृष्ट कोमसाप शाखा पुरस्कार,ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठीचा सौ. नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार कणकवलीच्या सरिता पवार यांना तर सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार प्राजक्ता राडये रत्नागिरी यांना, उमेदीच्या गुणवंत कवीस देण्यात येणारा कवी उमाकांत कीर स्मृति काव्य पुरस्कार रत्नागिरीचे विजयानंद जोशी यांना, वामनराव दाते स्मृती कोमसाप शाखा पुरस्कार पनवेल व लांजा शाखेला आणि युवा विभागात काम करणार्या कार्यकर्त्याला देण्यात येणारा कोमसाप युवा कार्यकर्ता पुरस्कार ठाण्याच्या जुईली अतितकर यांना जाहीर झाला आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणार्या वाङमयीन व वाड्मयीन पुरस्कार विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार, दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी कवी केशवसुत स्मारक मालगुंड याठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे. सन 2022-23 मधील सर्व पुरस्कार प्राप्त सर्वांचे कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, विश्वस्त प्रमुख रमेश कीर यांच्यासह कोकण मराठी साहित्य परिषद परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.