रुपेश पाटील
सावंतवाडी : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार अर्चना घारे – परब आणि विशाल परब या दोन्हीही उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. यामुळे आता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. या लढतीत तब्बल तीन वेळा निवडून गेलेले राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र असे असताना ऐनवेळी भारतीय जनता पार्टीमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत मशाल घेऊन रिंगणात उतरलेले राजन तेली यावेळी तरी आपले विजयी खाते उघड करणार का?, का इथली स्त्री-शक्ती अर्चना घारे – परब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार?, हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. एवढेच नव्हे तर अल्पावधीतच संपूर्ण राज्यात आपल्या सांस्कृतिक आणि विधायक उपक्रमांनी वेगळी छाप पाडणारे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष व येथील युवकांचे आयडॉल, युवा नेते विशाल परब हे देखील आपल्या अपक्ष उमेदवारीवर ठाम असल्यामुळे येथील जनता ‘विशाल’ निर्णय घेतील का?, हे देखील पाहणे खूप औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र आता सावंतवाडी मतदार संघ हा दुरंगी ऐवजी चौरंगी लढतीचा मतदार संघ असणार आहे. आगामी काळात जनता जनार्दन कोणता कौल देतो?, विद्यमान शालेय शिक्षण मंत्र्यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली असून राणे परिवाराचे त्यांना संपूर्ण सहकार्य आहे. त्यासाठी माजी नगराध्यक्ष संजू परब व भाजपा युवा नेते आणि प्रचंड दांडगा जनसंपर्क असलेले प्रभावी नेते व जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांनी देखील महायुतीच्या वतीने आपापल्या पद्धतीने मंत्री दीपक केसरकर यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. आगामी काळात हा मतदारसंघ नेमका कोणाला कौल देतो?, हे पाहणे देखील तेवढेच औत्सुक्याचे ठरेल, यात शंका नाही.
सावंतवाडी मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये करण्यात आलेले बंड थोपविण्यात वरिष्ठ अपयशी ठरलेत. बंडखोरानी माघार घेतली नसल्याने, महायुतीतील भाजपचे युवा नेते विशाल परब आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या अर्चना घारे – परब यांनी आज निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आपलं अर्ज मागे न घेतल्याने दोन्ही नेते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
परंतु या दोघांचाही बंडखोरीचा फटका नक्की कोणाला बसणार? हे येणाऱ्या 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या डोक्याचा ताप मात्र नक्कीच वाढला आहे. तसेच यांच्या सोबतच सामाजिक कार्यकर्ते आणि सावंतवाडीचे माजी नगरसेवक सुनील पेडणेकर आणि दत्ताराम गावकर यांनी देखील माघार घेतली नसल्याने, याही अपक्ष उमेदवारांचे आवाहन असणार आहे.