कुडाळ : तळकोकणात दिवाळीची सांगता होताच वार्षिक जत्रोत्सवांना सुरूवात होते. सिंधुदुर्गवासियांना आता वार्षिक जत्रोत्सवांचे वेध लागले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली मानाची वार्षिक जत्रा कुडाळ तालुक्यातील आवळेगाव येथील श्री देव नारायण मंदिरात मंगळवार 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी पालखी मिरवणूक ओट्या भरणे व रात्री खानोलकर दशावतार मंडळाचा दणदणीत नाट्य प्रयोग होणार आहे.
नारायण मंदिराच्या शेजारी विठ्ठल-रखुमाईचे मंदिर असून कार्तिक प्रबोधनी एकादशी निमित्त मंदिरात विविध उत्सव साजरे करण्यात येणार आहेत.
यावेळी दत्त मंदिर ते नारायण मंदिर अशी पायी दिंडी काढण्यात येणार आहे. ही जिल्हातील पहिलीच जत्रा दशक्रोशीसह जिल्हातील सर्व तालुक्यातील भाविक आणि दशावतारी नाटकांचे हौशी लोक आवर्जुन येतात. आवळेगावात घरोघरी सडा रांगोळ्याने घरे सजविले जातात.
दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह प्रारंभ होत असल्याने उसाच्या वाडांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. मुंबई, पुणे तसेच परदेशात येथील नोकरीनिमित्त असलेले आवळेगाव ग्रामस्थ जत्रेनिमित्त आवर्जुन उपस्थिती दर्शवितात.
या जत्रोत्सवापासून जिल्ह्यातील गावोगावच्या जत्रोत्सवांना सुरुवात होते. तरी या जत्रोत्सवाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन मानकरी, देवस्थान कमिटी व ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.