सावंतवाडी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोकण प्रांताचे 59 वे प्रांत अधिवेशन पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे होणार आहे. येथील भोसले नॉलेज सिटी येथे 27 ते 29 डिसेंबर 2024 दरम्यान हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात मुंबई ते गोवा या कोकण प्रांतातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. या अधिवेशनात विविध भाषण सत्र, चर्चा सत्र, परिसंवाद यांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अधिवेशनात विविध शैक्षणिक, सामाजिक विषयांना धरून प्रस्ताव पारित केले जाणार आहेत अशी माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोंकण प्रांत मंत्री संकल्प फळदेसाई यांनी दिली. येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. फळदेसाई म्हणाले, अधिवेशनात सावंतवाडी मधील मुख्य रस्त्यावरून विराट छात्रशक्तीची शोभायात्रा देखील निघून तिचा समारोप प्रांतातील विविध जिल्ह्यातून आलेल्या छात्र नेत्यांच्या भाषणाने होईल.
अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध पैकाणे ग्रूप अध्यक्ष अतुल पै काणे व स्वागत समिती सचिव म्हणून अभाविप सिंधुदुर्गचे पूर्व कार्यकर्ते व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर हे असणार आहेत अशी माहिती संकल्प फळदेसाई यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिवेशनात लक्ष वेधून ते पारीत केले जाणार आहेत. शैक्षणिक, सामाजिक विषयांवर चर्चा केली जाणार असून यानिमित्त भव्य शोभायात्रा सावंतवाडी शहरात निघणार आहे. परंपरा, संस्कृतीच दर्शन यात होणार आहे. त्यानंतर जाहीर सभा गांधी चौक येथे होणार असून २९ डिसेंबरला अधिवेशनाचा समारोप होणार आहे. मागील वर्षीच अधिवेशन दिल्ली येथे झाल होत. यावर्षीच कोकण प्रांत अधिवेशन सावंतवाडी येथे होत आहे. कोकण पट्टयातील विद्यार्थी यावेळी उपस्थित रहाणार आहेत. या अधिवेशनासाठी स्वागत समिती बनविण्यात आली असून अतुल पै काणे हे अध्यक्ष असणार आहेत. तर सचिव अतुल काळसेकर, व्यवस्था प्रमुख चिन्मयी प्रभू खानोलकर असणार आहेत अशी माहिती श्री. फळदेसाई यांनी दिली.
दरम्यान, अतुल काळसेकर म्हणाले, माझ्यासाठी हा बहुमान आहे. मोठं अधिवेशन आपल्याकडे होत आहे. एक हजारहून जास्त विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. अधिवेशनाच्या स्वागताची जोरदार तयारी आम्ही केली आहे. विद्यार्थ्यांचे असंख्य विषय आंदोलनाच्या माध्यमातून सोडवले आहेत. चांगले कार्यकर्ते आम्ही या चळवळीतून निर्माण केले आहेत. या निमित्ताने होणारी शोभायात्रा व गांधी चौकात होणारी जाहीर सभा विशेष असेल असे मत श्री. काळसेकर यांनी व्यक्त केले. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोंकण प्रांत मंत्री संकल्प फळदेसाई, स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर, जिल्हा संयोजक अधर्व श्रृंगारे, व्यवस्थापक सचिव चिन्मयी प्रभूखानोलकर, सावंतवाडी शहर मंत्री स्नेहा धोटेळ, अवधूत देवधर, जिल्हा कार्यालय मंत्री तुषार पाबळे आदी उपस्थित होते.