रत्नागिरी : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, झाडगाव (रत्नागिरी) येथे संस्थेचे संकल्पक, संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा ३७ वा स्मृतिदिन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे शिक्षक सुरेश चौगुले, वसतीगृहाचे अधिक्षक बागडी सर, तानाजी गायकवाड, सुरेश सुतार, एम. डी. पाटील, भुजबळराव मॅडम, सागर कदम, शिक्षकेत्तर कर्मचारी राजेंद्र फगरे, श्री. पवार यांच्यासहीत इयत्ता 5 वी ते इयत्ता 10 अखेरचे विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित होते.
स्वतंत्रपणे काम करता यावे, म्हणून बापूजींनी ३१ डिसेंबर १९५४ रोजी ‘श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थे’ची नोंदणी केली. या संस्थेने ६ जून १९५५ रोजी कोल्हापूर, तासगाव, चाफळ, उंडाळे व तारळे या ठिकाणी माध्यमिक शाळा सुरू केल्या. कराड येथे अध्यापिका विद्यालय व वसतिगृहे सुरू केली. त्यांनी ‘ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कारासाठी शिक्षणप्रसार’ हे संस्थेचे ब्रीद निश्चित केले. महाराष्ट्रातील १८ आणि कर्नाटकातील १ अशा एकूण १९ जिल्ह्यांतील खेड्यापाड्यांत, आदिवासी दुर्गम भागांत, उपेक्षित आणि विस्थापित समाजघटकांपर्यंत ज्ञानप्रसार केला. संत गाडगेबाबांचे शिष्य शिंदेमहाराज यांनी २३ डिसेंबर १९६८ रोजी ‘शिक्षणमहर्षी’ म्हणून त्यांना गौरविले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय कोल्हापूर येथे आहे.
या संस्थेची १७० माध्यमिक विद्यालये; ६६ कनिष्ठ महाविद्यालये; १८ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालये; ८ प्रशिक्षण महाविद्यालये; ३ बी. एड. कॉलेज; १ विधी महाविद्यालय; १ निवासी आश्रमशाळा आणि १९ वसतीगृहे अशी सुमारे ३३० शाखा आहेत. या संस्थेबद्दलची आणि बापूजींबद्दलची माहिती मुख्याध्यापक श्री. ए. डी. पाटील आणि शिक्षक श्री. अशोक सुतार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. यावेळी इ. ५ वी ते इ. १० वी च्या विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ढोल-ताशांच्या गजरात, विविध घोषणा देत यावेळी फेरीचे आयोजन विद्यालयाचे शिक्षक तानाजी गायकवाड, क्रीडाशिक्षक श्री. एम. डी. पाटील, श्री. अमोल मंडले, सौ. स्वप्नाली भुजबळराव, श्री. सुरेश चौगुले, श्री. सागर कदम, सौ. बागडी मॅडम, सौ. साळवी मॅडम, सौ. कोळंबेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सर्व इ. ५ वी ते इ. १० वी अखेरच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सहभाग नोंदवत सदर सोहळा उत्साही वातावरणात पार पाडण्यास सहकार्य दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक डी. एन. पाटील यांनी केले.