वाढदिवस विशेष..!
मंडळी, सन २०१५ मार्च महिन्यात मी धुळे अर्थात खान्देश सोडून थेट तळकोकणात म्हणजे सावंतवाडीत नोकरी निमित्ताने आलो.
इथली माती, नाती, संस्कृती, इथली माणसं, इथली सांस्कृतिक आणि वैचारिक ठेवण याची मला तसू भरही कल्पना नव्हती. मी अनभिज्ञ होतो. मात्र हळूहळू ह्या सर्व गोष्टींची मला जाण करून दिली ती आज ज्यांचा वाढदिवस आहे ते माझे सन्मित्र, आणि मला नेहमी दीपस्तंभासमान मार्गदर्शन करणारे ॲड. नकुलजी पार्सेकर यांनी.
सावंतवाडीची वैचारिक जडणघडण जेथे घडते ते सावंतवाडीचे भूषण असलेले आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले श्रीराम वाचन मंदिरात आयोजित एका व्याख्यानादरम्यान माझी आणि नकुलजी यांची ओळख झाली.
दरम्यान, व्याख्यान संपल्यावर पार्सेकर सर आणि मी एका ठिकाणी चहा घेतला आणि त्या ठिकाणी “सर, आपण कुठून आलात?, नवीन दिसतात?, काय करतात?, अशी आपसूकच त्यांनी माझी विचारपूस केली.
मात्र ही विचारपूस करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर जणू काही ते कित्येक वर्षे मला ओळखतात की काय?, असा भाव जाणवला.
मित्रहो, काही व्यक्ती क्षणात माणसाला आपलेसे करतात, त्यापैकीच नकुलजी एक आहेत.
मला त्यांचा स्पष्टपणा आणि सडेतोडपणा विशेष आवडला.
ज्या गोष्टी पटत नाहीत, त्या तोंडावर ‘नाही’ म्हणणे हा त्यांचा रोखठोक स्वभाव.
कदाचित या स्वभावामुळेच अनेकदा त्यांना सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात अनेकांचा रोष पत्करावा लागला असावा आणि ते साहजिकच आहे.
कारण स्पष्ट बोलणारा व्यक्ती सहजासहजी कोणाला आवडतो, असे नाही.
मात्र नकुलजी यांच्याकडे तो प्रचंड चांगला गुण आहे आणि मलाही तो भावला. यादरम्यान कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही एकत्रित केले. यादरम्यान वेळोवेळी त्यांनी मला मौलिक मार्गदर्शन केले. त्यांच्या सुख-दुःखात मी आणि माझ्या सुख-दुःखात ते असे काही समरस झालोत की जणू काही मी त्यांचा लहान बंधूच आहे.
गेल्याचं वर्षी आमची भगिनी आणि नकुलजी यांची लहान कन्या प्रियाच्या स्वागत समारंभाच्या वेळी नकुलजींनी मला ‘निवेदक’ ही महत्त्वाची जबाबदारी मोठ्या भरवशावर दिली आणि मीही ती हक्काने स्वीकारली.
या स्वागत समारंभात अनेक दिग्गजांचा परिचय करून देण्याचे भाग्य त्यांच्यामुळे मला लाभले.
यात सावंतवाडी संस्थानचे राजघराणे, देशाचे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि माजी मंत्री सुरेशजी प्रभू साहेब आणि सौभाग्यवती उमाजी प्रभू, आमदार नितेशजी राणे, माजी आमदार प्रमोदजी जठार, राजनजी तेली यांपासून अनेक सामाजिक, वैद्यकीय, उद्योग, आणि अनेक साहित्य क्षेत्रातील दिग्गज मंडळी या समारंभात आल्या होत्या. त्या सर्वांना योग्य तो सन्मान देण्यासाठी नकुलजी आघाडीवर होते. एका सामान्य व्यक्तीच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत समारंभ प्रसंगी एवढे दिग्गज लोक मी कधी बघितले नव्हते. नकुलजी यांच्या रूपाने एक सामान्य माणसाची असामान्य उंची समजली. त्यांनी मला निवेदक म्हणून दिलेल्या जबाबदारी पार पाडताना कदाचित माझ्या थोड्याफार उणीवा राहिल्या असतील, हे मी मान्य करतो. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर दोन दिवसांनी जेव्हा ते भेटले तेव्हा *”छान, मस्त.”* हे नकुलजी यांच्या मुखातून निघालेले दोन शब्द ऐकले आणि मनाला धन्यता वाटली.
सामाजिक जीवनात वावरत असताना अन्यायाविरुद्ध विद्रोह करणारे व्यक्तिमत्व म्हणून नकुलजी* सगळ्यांना परिचित आहेत.
आपल्या अंगी अनेक गुण असूनही त्यांना त्या गुणांचा कधीही अभिमान किंवा गर्वाचा अजिबात लवलेश नाही. आता तर त्यांच्यामुळे अनेक संस्था आणि व्यक्तींसोबत माझाही थोडाफार परिचय झाला. त्यांच्या माध्यमातून स्वेच्छा निवृत्ती घेतलेले बँक अधिकारी माननीय संतोष राणे साहेब, एक आदर्श सरपंच संतोष राणे साहेब, महाराष्ट्रातील यशस्वी उद्योजक आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व संजीवजी कर्पे, मोहनजी होडावडेकर, आनंदजी बांदिवडेकर, युवा उद्योजक कुणालजी वरस्कर…..आणि ही यादी फार मोठी आहे.
मात्र ही सर्व मंडळी माझ्या जीवनात मित्र म्हणून आली त्याचे श्रेय फक्त आणि फक्त जाते ते पार्सेकर साहेबांना. विशेष म्हणजे मुंबई येथील यशस्वी उद्योजक अनिलजी घाडी यांच्यासारखे एक जिंदादिल व्यक्तिमत्व देखील त्यांच्यामुळेच माझ्या जीवनात आले आणि आमची मैत्री घट्ट झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नकुलजी यांच्या स्वभावाचे पैलू म्हणजे त्यांची जडणघडण राष्ट्रीय सेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ यांसारख्या शिस्तप्रिय संघटनेत झाल्यामुळे त्यांना अनेक बाबतीत शिस्त आवडते. सर्वात महत्त्वाचे वेळेचे बंधन, इतरांचा आदर, सामाजिक बांधिलकी, दुसऱ्यांच्या दुःखात धावून जाणे हे त्यांचे गुण मला आवडतात.
आदरणीय नकुलजी हे एक जिंदादिल व्यक्ती तर आहेतच. मात्र व्यक्ती कितीही छोटा असला तरी ते त्यांना आपले मानून त्यांची आदराने आणि आपुलकीने विचारपूस करतात. आजच्या यांत्रिक युगात हम दो हमारे दो, माँ – बाप को फेंक दो.!, अशी विकृत अवस्था असतानाही नकुलजी यांचा मित्र, परिवार, गोतावळा प्रचंड मोठा आहे.
मागील वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती. या कामी माझा खारीचा वाटा उचलण्यास त्यांनी मला आपुलकीने सांगितले.
मात्र यादरम्यान काम करताना जो दैवी आनंद आला त्याची तुलना कोणत्याही आनंदात होणार नाही. कारण गेल्या वर्षी ज्यांचे विवाह झाले ते सर्व जोडपी हे दिव्यांग होते. आणि दिव्यांगांचे संसार जोडून त्यांना आनंदाने पुढील आयुष्यासाठी महत्त्वाची दिशा देण्याचे महान भाग्य आदरणीय नकुलजी यांच्यामुळे माझ्यासारख्या पामराला लाभले.
महाराष्ट्रातील एक मोठी सामाजिक चळवळ अर्थातच जिजाऊ संघटनेचे शिल्पकार आणि एक दानशूर व्यक्तिमत्व माननीय निलेशजी सांबरे यांचाही परिचय नकुलजींमुळेच झाला.
तब्बल अडीच लाख लोकांचा जनसमुदाय एकत्रित करून त्यांना मार्गदर्शन करत असताना एक महत्त्वाची जबाबदारी नकुलजींकडे होती आणि याहीवेळी मी लहान बंधू म्हणून त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केले.
आजतागायत असे अनेक प्रसंग आले, ज्या ठिकाणी नकुलजी मला हक्काने सोबत घेऊन गेले.
मात्र मला परकेपणा कधी येऊ दिला नाही.
आज मी माझ्या गावापासून, घरापासून तब्बल १००० किलोमीटर एवढ्या लांब अंतरावर आहे.
मात्र येथे मला कोणीही परके वाटले नाही. कारण नकुलजी यांच्या सहवासामुळे संपूर्ण तळकोकण माझे झाले आहे.
सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सहकार, उद्योग, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रात नकुलजी पारंगत आहेत.
मात्र तरी देखील त्यांचे पाय जमिनीवर आहेत.
कधीही कोणाला ते कमी लेखत नाहीत व तसे त्यांच्या वागण्यात कधी दिसत नाही. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात सडेतोडपणा आहे. स्पष्टता आणि सत्यता आहे. यामुळे अनेक जण कदाचित त्यांच्यापासून दुरावले जात असतील. मात्र म्हणतात ना कोकणी माणूस हा फणसासारखा असतो आणि तसाचं एक गोड फणस नकुलजींच्या रूपाने माझ्या जीवनात आला, हे मी माझे या जन्माचे भाग्य समजतो. आज त्यांचा वाढदिवस.
माननीय नकुलजी…,
झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळही पाहत रहावा,
कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून, यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिकाधिक विस्तारीत होत जावो,
तुमच्या समृध्दीच्या सागराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढील आयुष्य सुख, समृद्धी, निरामय आणि ऐश्वर्य संपन्न होवो, हीच सदिच्छा..!
वाढदिवसाच्या हृदयपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
स्नेह तर कायमचं, वृद्धीची अभिलाषा..!
🎂आपलाच स्नेही🎂
✍️..रुपेश पाटील..✍️
सावंतवाडी..!
🎂🎂🎂🎂🎂