मुंबई : आजपर्यंत मी नेहमीच चौकुळ ग्रामस्थ बांधवांच्या प्रश्नांसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. सावंतवाडी तालुक्यातील चौकुळवासीयांच्या मागण्यांना माझा मनापासून संपूर्ण पाठिंबा आहे. त्यांच्या मागणीनुसारच मी उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित केली आहे. मात्र, ज्यांना या बैठकीबाबत निमंत्रण मिळालं नाही, त्यांनी उद्याच्या बैठकीला उपस्थित राहावे. त्यांची येण्याची व्यवस्था आपण नक्कीच करू किंवा ते जर ऑनलाईन उपस्थित राहत असतील तर तशीही व्यवस्था केली जाईल. त्यांनी आपले मुद्दे मांडावे व हा विषय सोडविण्यासाठी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.
आज मंत्रालयातून दुरस्थ प्रणालीद्वारे मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री केसरकर पुढे म्हणाले, १५ ऑगस्ट रोजी चौकुळ ग्रामस्थांनी पुकारलेल्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर आपण गावात जाऊन ग्रामस्थांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये मुंबई येथे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावल्यास आम्ही उपोषण मागे घेऊ, असा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार उद्याची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक उद्या आयोजित करण्यात आली आहे. मात्र, जर कोणाला या बैठकीचे आमंत्रण नसेल तर माझे आवाहन हेच आमंत्रण समजून त्यांनी मुंबईला येण्याची तयारी ठेवावी. तशा प्रकारची व्यवस्था माझ्या कार्यालयामार्फत करण्यात येईल. शिवाय कोणाला ऑनलाईन पद्धतीने या बैठकीला उपस्थित राहायचे असेल तर तशीही व्यवस्था केली जाईल. मुळात हा जमीन प्रश्न सुटणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी या बैठकीला उपस्थित राहून आपले मुद्दे मांडावे. जेणेकरून हा प्रश्न आचारसंहितेच्या आधी सुटणे गरजेचे आहे. उद्याच्या बैठकीला मुख्यमंत्री यांच्या समवेत वनमंत्री व महसूल मंत्री तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे उद्याची बैठक महत्त्वाची असून चौकुळ प्रश्नावर यातून तोडगा निघण्याची आशा आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मंत्री केसरकर पुढे म्हणाले, मी चौकुळ ग्रामस्थांच्या बाजूने आहे. ही जमीन सर्व गावाची आहे व ती सर्व ग्रामस्थांना मिळायला हवी हीच आमची भूमिका आहे. त्यांची जी मागणी आहे की सातबारा उतारावरील महाराष्ट्र शासन बाजूला करून कबूलायतदार गांवकर असे करण्यात यावे. मात्र, जर कायद्याने ते शक्य असेल तर त्याबाबत उद्याच्या मीटिंगमध्ये निर्णय घेण्यात येईल. त्याला माझी कोणतीही हरकत नसेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, अशा परिस्थितीतही ग्रामस्थ उपोषणाबाबत ठाम असतील तर आपण १५ ऑगस्टला ध्वजारोहणाला उपस्थित राहणार आहोत. यावेळी माझ्यासोबत जिल्हाधिकारी सुद्धा असणार आहेत. यावेळी आपण चौकुळ येथे जाऊन त्यांची भेट घेऊ. त्यांची मागणी असल्यास आपण मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने मुख्य सचिवांना सोबत घेऊन चौकळवासियांची भेट घेईन व या प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करीन, मात्र चौ्कुळ ग्रामस्थांनी उद्याच्या बैठकीला उपस्थित राहून सहकार्य करावे, असेही शिक्षण मंत्री केसरकर यांनी आवाहन केले.