मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली, या भेटीदरम्यान त्यांनी काही कागदपत्रं अजित पवार यांच्याकडे सादर केले होते. त्यांनी बीडच्या काही कंपन्यांचे बॅलेन्स शिट देखील अजित पवार यांना दाखवले होते. ज्यावर मुंडे पती-पत्नीच्या सह्या असल्याचा दावा दमानिया यांच्याकडून करण्यात आला होता. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे कसे आर्थिक संबंध आहेत याची कल्पना आपण अजित पवार यांना दिल्याचं या भेटीनंतर अंजली दमानिया यांनी म्हटलं होतं. दरम्यान अंजली दमानिया यांच्या भेटीनंतर आज अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
अंजली दमानिया यांनी काही कागदपत्रं माझ्याकडे दिले होते. ते मी पाहिले. मी आज सध्यांकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होतो. मात्र त्यांना नागपूरला जायचं होतं, त्यामुळे आताच भेट घेतली. मी दमानियांची कागदपत्रं मुख्यमंत्र्यांना दाखवली. ते म्हणाले त्यांनी माझी देखील भेट घेतली आहे. त्यांनी मला देखील कागदपत्रं दिली आहेत. मात्र जेव्हा कोणी पुरावे देतं तेव्हा त्याची शाहानीशा होणं गरजेचं असतं त्यामुळे ते तपासणीसाठी एसआयटीकडे आणि सीआयडीकडे देण्यात आले आहेत. जी वस्तूस्थिती समोर येईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी माला सांगितल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.