सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघातील सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग या तीन तालुक्यातील १५० गावांमध्ये जाऊन जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, व जनतेला त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी रा. काँ. शरदचंद्र पवार पक्षाची ‘जाणीव जागर यात्रा’ शुक्रवार, दिनांक १६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यासंदर्भात आज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण महिला अध्यक्ष सौ. अर्चना घारे – परब, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. रेवती राणे, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, तालुकाध्यक्ष योगेश कुबल, महिला तालुकाध्यक्ष दीपिका राणे, सोशल मीडिया कोकण विभागीय अध्यक्ष सचिन पाटकर, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, वेंगुर्ला कार्याध्यक्ष सुशांत कोसुलकर, तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष जहूर खान, महिला तालुकाध्यक्ष मारीत फर्नांडिस, महिला शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी, तौसीफ आगा, मनोज वाघमोरे, युवक तालुकाध्यक्ष ऋतिक परब, सावंतवाडी विधानसभा समन्वयक राजू भगत आदिंसह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित पत्रकारांना ‘जाणीव जागर यात्रे’बद्दल कोकण महिला अध्यक्ष सौ. अर्चना घारे – परब यांनी सविस्तर माहिती सांगितली व जनतेला उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या.
यावेळी सौ. अर्चना घारे – परब यांनी अधिक माहिती दिली. त्या पुढे म्हणाल्या, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेच्या निमित्ताने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्गातील गावागावात जात आहोत. आजही सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग, तालुक्यातील नागरिक आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत. आपले मूलभूत हक्क जसे की, आरोग्याच्या चांगल्या सुविधा, स्वतःच्या गावी स्वतःच्या तालुक्यात हाताला काम म्हणजे रोजगार आणि स्वयंरोजगार, शेतीमालाला हमीभाव, आमच्या सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाड्यांना थांबे, विजेची समस्या, आमच्या मच्छीमार बांधवांच्या समस्या आहेत. हे सगळे आमचे हक्क आहेत. या आणि अशा इतरही सगळ्या हक्कांसाठी, या हक्कांचा जागर करण्यासाठी, आम्ही या यात्रेच्या निमित्त गावागावात जाणार आहोत. आपल्या हक्कांचा जागर करणार आहोत. जनसामान्यांना हेही सांगणार आहोत की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक शक्ती दिली आहे. लोकशाहीमध्ये आपल्याला ताकद दिली आहे, मतदानाच्या अधिकाराच्या रूपाने !! त्या शक्तीची, त्या ताकतीची देखील जाणीव या निमित्ताने आम्ही लोकांना करून देणार आहोत. आपले हक्क प्राप्त करण्यासाठी या शक्तीचा वापर करण्याची वेळ आलेली आहे.
या यात्रेची सुरुवात आम्ही 16 ऑगस्ट पासून रेडी येथील श्री गणेशाचे दर्शन घेऊन करणार आहोत. आमचा पहिला थांबा हा शिरोड्यातील सत्याग्रहाच्या ठिकाणी असणार आहेत. आम्ही सुरुवात शिरोडा सत्याग्रह ठिकाणापासून करतोय कारण त्या भूमीला एक इतिहास आहे. इंग्रजांसारखी बलाढ्य शक्ती की, ज्यांच्या साम्राज्यात म्हणे सूर्य कधी मावळतच नव्हता. अशा शक्तीला आव्हान देऊन, आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्यसैनिकांनी मूठभर मीठ उचलून आपले हक्क प्राप्त करून घेतले आणि मिठाचा सत्याग्रह म्हणून एक इतिहास घडला. ज्या ठिकाणी हा संघर्ष झाला, सत्याग्रह झाला, त्यापैकी एक ठिकाण म्हणजे शिरोड्याची भूमी ! आणि म्हणून मुद्दामून आम्ही यात्रेची सुरुवात शिरोड्याच्या ऐतिहासिक आणि पवित्र भूमीतून करतोय. आमचे हक्क प्राप्त करण्यासाठी शांततेच्या, अहिंसेच्या आणि संविधानिक मार्गाने आम्ही प्रयत्न करू. या यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करून या व्यवस्थेला जागे करू. जाग आणण्याचा काम करू.
आपल्या माध्यमातून मला तमाम सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना सांगायचे आहे. आम्ही आपल्या गावी आपल्या वाडीवर, आपल्या वस्तीवर, आपल्या हक्कांचा जागर करण्यासाठी आपल्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी जाणीव जागरण यात्रेच्या निमित्ताने 16 ऑगस्ट पासून येत आहोत आपणही मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये सहभागी व्हा.