सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत पालकमंत्री नितेश राणे यांचे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष दुर्गेश उर्फ देव्या सूर्याजी यांनी लक्ष वेधले. रूग्णालयात फिजिशीअनसह रिक्त असलेली पद भरावीत तसेच रूग्णांच्या समस्या दूर कराव्यात अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. याला मंत्री नितेश राणेंनी सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाहीची ग्वाही दिली.
युवा रक्तदाता संघटनेकडून मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांना उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांविषयी निवेदन देण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी मंत्री राणेंचं याकडे लक्ष वेधलं. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, सचिव अर्चित पोकळे, सदस्य संदीप निवळे, वसंत सावंत आदी उपस्थित होते. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील समस्यामुळे ग्रामीण भागातील व गोरगरीब जनतेला हाल अपेष्टा सहत कराव्या लागत आहेत. वारंवार लक्ष वेधूनही यात कोणतेही बदल होत नाहीत. त्यामुळे यात लक्ष घालून या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे व रुग्णालयातील रिक्त पदे मंजूर करून तातडीने भरण्यात यावीत अशी मागणी श्री. सुर्याजी यांनी राणेंकडे केली.
येथील असुविधेमुळे गोवा-बांबोळी येथे रुग्णांना पाठविले जाते. रिक्तपदे व वैद्यकीय असुविधा याला कारणीभूत असल्याने यावर उपाययोजना करण्यात यावी. प्रथमतः तातडीने फिजिशीअन व भुलतज्ञ उपलब्ध करून देण्यात यावा. रुग्णालयाला कायमस्वरूपी वैद्यकीय अधिक्षक मिळावा, डॉक्टर पूर्णवेळ २४ तास सेवा देतील अशी उपाययोजना करावी. शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार ओपीडीत पुर्णवेळ डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. डॉक्टर ड्युटी बोर्ड लावण्यात यावा आदी मागण्या केल्या.
तसेच जिल्ह्यातील दोन रक्तपेढ्यांमधील रिक्तपद तातडीनं मंजूर करुन भरण्यात यावी. सावंतवाडीतील शवविच्छेदन केंद्रात डागडुजी करण्याचे आदेश बांधकाम विभागाला देण्यात यावेत. कायमस्वरूपी शवविच्छेदन साठी सफाईगार देण्यात यावा. स्वतंत्र पाण्याचा टाकीची सोय करण्यात यावी. ग्राभीण भागातील बरेच रुग्ण रुग्णालयात येत असल्याने ओपीडीच मेडिकल स्टोअर शासनाच्या वेळेत सुरु व बंद व्हावी. अन्यथा, वेळ वाढविण्यात यावी. तसेच अतिदक्षता विभाग, अपघात विभागाला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, जेणेकरून डॉक्टरांवर होणारे हल्ले व इतर घटनांना आळा बसेल आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्याचप्रमाणे दर शुक्रवारी बालरोगतज वेळेत उपस्थित राहत नसल्याने बालकांसह
नातेवाईकांना होणारा त्रास दूर करण्यात यावा. उपजिल्हा रुग्णालय परिसरातील नादुरुस्त झालेले रस्ते नव्याने बनविण्यासाठी त्यांचे लक्ष वेधलं. या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा अशी मागणी पालकमंत्री नितेश राणेंकडे करण्यात आली. यावेळी श्री. राणेंकडून युवा रक्तदाता संघटनेला सकारात्मक प्रतिसाद देत आरोग्य सुविधांच्या सुधाराणेबाबत कार्यवाहीची ग्वाही देण्यात आली.
ADVT –