Sunday, June 22, 2025

Buy now

spot_img

व्हॅलेंटाईन डे’ एक कुप्रथा.!

विशेष लेख..

प्रस्तावना : 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याची पाश्चात्त्य कुप्रथा आपल्या देशातही मोठ्या प्रमाणावर प्रचलित झाली आहे. ज्या व्हॅलेंटाईनला ख्रिस्त्यांचे धर्मगुरु पोप यांनीच ‘या नावाचा कोणताही संत नाही’ असे म्हणून रोमन दिनदर्शिकेतून पूर्वीच काढून टाकले, त्याच्या नावाने भारतात ‘प्रेम दिवस’ साजरा करणे हे दुर्दैवी आहे.

व्हॅलेंटाईन डे संपूर्ण जगात विशेषतः अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आदी देशांमध्ये साजरा केला जातो आणि हल्ली भारतातही इतर सणांप्रमाणे तो मोठ्या प्रमाणावर साजरा होऊ लागला आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अनेक अनुचित प्रकार घडतात, जसे की तरुणींवरील अत्याचार, मद्यपान, आणि अन्य अनैतिक वर्तन. एका अहवालानुसार, या दिवशी गर्भनिरोधके आणि निरोध यांच्या विक्रीत १० पट वाढ होते.

भारतामध्ये ७ फेब्रुवारीपासून १४ फेब्रुवारीपर्यंत रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि व्हॅलेंटाईन डे असे आठ दिवस साजरे केले जातात. हे दिवस परदेशातही इतक्या मोठ्या प्रमाणावर साजरे केले जात नाहीत. यावरूनच भारतातील सामाजिक अधःपतन किती झाले आहे, हे दिसून येते.

फुले देऊन खरी प्रेमभावना व्यक्त होत नाही :

पाश्चात्त्य देशांमध्ये स्त्रियांना आणि मुलींना फुलांचे गुच्छ विशेष आवडतात. त्यांना वाटते की, जो कोणी त्यांना फूल देतो तो खरोखरच त्यांच्यावर प्रेम करतो. भारतातही याच अनुकरणाने तरुण तरुणींना गुलाबाची फुले किंवा फुलांचे गुच्छ देतात. परंतु हिंदू धर्मात प्रेम व्यक्त करण्यासाठी कधीही गुलाबाचे फूल किंवा फुलांचे गुच्छ दिले जात नाहीत. फुले हे देवतांना अर्पण करण्यासाठी असतात, दारावर तोरणासाठी वापरली जातात, सात्त्विकता वाढवण्यासाठी गजरा म्हणून मस्तकावर माळली जातात, अशा विविध प्रकारे त्यांचा उपयोग होतो.

व्हॅलेंटाईन डे अनैतिकतेच्या उच्चतम टप्प्यावर !

बहुसंख्य तरुण-तरुणी कामवासना पूर्ण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करतात. एका सर्वेक्षणानुसार, सुमारे ३० टक्क्यांहून अधिक तरुण-तरुणी या दिवशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी हा दिवस साजरा करतात. गर्भनिरोधक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या मते, इतर दिवसांच्या तुलनेत या दिवशी गर्भनिरोधकांची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढते. याचा अर्थ असा की, अविवाहित तरुण-तरुणी या दिवशी अनैतिक संबंध ठेवतात, आणि परिणामी अविवाहित तरुणींना गर्भपात करावा लागतो. या प्रकारामुळे समाजाचे नैतिक स्वास्थ्य बिघडते. हिंदू धर्मात विवाहापूर्वीचे शारीरिक संबंध निषिद्ध मानले गेले आहेत.

समाज व्यवस्थेचा ऱ्हास करणारा व्हॅलेंटाईन डे –

‘इंटरनॅशनल बिझनेस टाइम्स’ या दैनिकानुसार, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आत्महत्येसंबंधी हेल्पलाइनवर सर्वाधिक फोन येतात. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अपेक्षित प्रेम न मिळाल्यामुळे निर्माण होणारे नैराश्य आणि एकाकीपण हे त्याचे प्रमुख कारण असते. या दिवशी अनेक तरुण-तरुणी मानसिक तणावामुळे नैराश्यात जातात. अशा परिस्थितीत समाजव्यवस्था उद्ध्वस्त करणारा आणि अनेक व्यक्तींना नैराश्यात ढकलणारा हा दिवस आपण साजरा का करतो?

पाकिस्तानमध्येही व्हॅलेंटाईन डेवर बंदी –

पाकिस्तानच्या एका उच्च न्यायालयाने १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास बंदी घातली होती. न्यायालयाच्या मते, सोशल मीडियावर व्हॅलेंटाईन डेचा प्रचार करणे हे इस्लामच्या विरोधात आहे. न्यायालयाने सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला अशा कोणत्याही प्रचारास प्रतिबंध घालण्याचे आदेश दिले होते. (स्रोत : नवभारत टाइम्स) पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती ममनून हुसैन यांनीही व्हॅलेंटाईन डे हा मुस्लिम परंपरांविरोधात आहे असे सांगत तो न साजरा करण्याचे आवाहन केले होते.

देशासाठी यौवन अर्पण करणाऱ्या क्रांतिकारकांना विसरू नका!

आपल्या संस्कृतीनुसार, व्यक्तीपेक्षा कुटुंब, कुटुंबापेक्षा समाज आणि समाजापेक्षा देश अधिक महत्त्वाचा आहे. या दृष्टिकोनातूनच भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांसारख्या वीरांनी आपले यौवन देशासाठी अर्पण केले, ज्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. जर त्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या तथाकथित प्रेमभावनेला महत्त्व दिले असते आणि विवाह करून आपले जीवन व्यतीत केले असते, तर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असते का? याचा विचार करायला हवा.

हिंदू धर्माने शिकवलेले उच्च मूल्य !

व्हॅलेंटाईन डे आणि अशा प्रकारचे दिवस पाश्चात्त्यांनी निर्माण केलेल्या कुप्रथा आहेत. या दिवसांमध्ये मिळणाऱ्या तथाकथित आनंदाच्या पलीकडे, हिंदू धर्माने शिकवलेले सत्य, चिरंतन आनंद आणि मोक्ष यासारखे महान तत्त्वज्ञान आहे. जर आपण हिंदू धर्माचा अभ्यास करून त्याचे आचरण केले, तर जीवन तणावमुक्त होऊन जीवनात आनंद अनुभवता येतो.

त्यामुळे व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याऐवजी, हिंदू धर्माचे योग्य शिक्षण घ्या, धर्माचरण करा आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करा. लक्षात असू द्या ‘धर्मो रक्षति रक्षितः’ अर्थात , ‘ धर्माचे रक्षण करणाऱ्याचे धर्म रक्षण करतो’.

श्री. हेमंत मणेरीकर
हिंदु जनजागृती समिती,
संपर्क क्रमांक :94238 79509

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles