सावंतवाडी : पीपल्स आर्ट सेंटर, मुंबई या राष्ट्रीय पातळीवर सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्यावतीने साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक प्रा. प्रवीण बांदेकर यांना साहित्यिक योदानाबद्दल गौरविण्यात येणार आहे. गेली तेरा वर्षे भारतभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी संस्थेतर्फे सन्मानित करण्यात येते. यावर्षीच्या १४ व्या गौरव सोहळ्यात अन्य क्षेत्रातील मान्यवरांसह साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल प्रवीण दशरथ बांदेकर यांना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल असे या सन्मानाचे स्वरूप आहे. २२ फेब्रूवारी २०२५ रोजी सायंकाळी जुहू, मुंबई येथे हा सन्मान सोहळा संपन्न होत आहे. बांदेकर यांच्यासह डॉ. विश्वनाथ कराड, ऍथलिट रझिया शेख, इंग्रजी लेखक अजित मेनन, चित्रपट निर्माता आदिनाथ कोठारे, गायिका मंजुश्री पाटील, शिक्षण क्षेत्रातील रवींद्र कर्वे, पत्रकार श्रीकांत बोजेवार, चित्रकार सुहास बहुलकर, गिर्यारोहक विवेक शिवदे आदींनाही हा सन्मान दिला जाणार आहे.
साहित्य अकादमीतर्फे २०२२ चा मराठी भाषेतील साहित्यकृतीसाठी प्रा. प्रवीण बांदेकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला. बांदेकर यांच्या चाळेगत, उजव्या सोंडेच्या बाहुल्या, इंडियन ऍनिमल फार्म या कादंबरी प्रसिद्ध आहेत. याशिवाय येरु म्हणे, खेळखंडोबाच्या नावाने, चीनभिन हे कवितांग्रह तर घुंगुरकाठी, आरते परते हे ललितलेख संग्रह प्रसिद्ध आहेत.
ADVT –