Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

छत्रपती शिवराय आजही सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरू.! : प्रा. रूपेश पाटील. ; सी. गो. पाटील महाविद्यालयात ‘शिवव्याख्यान’ संपन्न.

सावंतवाडी : सोळाव्या शतकात स्वराज्य निर्मितीच्या कार्यात अठरापगड जातीच्या लोकांच्या मनात सर्वस्वाने सामील होऊन ‘हे राज्य आमचेच आहे!’ ही आपुलकीची भावना त्यांच्यात निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले उत्तम नियोजन, तसेच कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त साधन सामुग्री गोळा करण्याचे महाराजांच्या अतुलनीय कार्याला सर्वोत्कृष्ट मॅनेजमेंट म्हणता येईल, असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी साक्री (जि.धुळे) व्यक्त केले.

साक्री येथील विद्या विकास मंडळाचे सिताराम गोविंद पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्रीच्या इतिहास विभागामार्फत शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित ‘छत्रपती शिवराय – सर्वोच्च मॅनेजमेंट गुरू’ या विषयावर आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रा. रुपेश पाटील बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. अनंत पाटील, माजी मराठी विभाग प्रमुख प्रा. एल. जी. सोनवणे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. एन. डी. भामरे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भूषण अहिरराव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात जामखी पावरा आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी प्रा. रुपेश पाटील पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक कार्यात शिस्तबद्ध नियोजनाला महत्त्व देत असत. कोणत्याही मावळ्याला मोहिमेत सामील करून घेताना त्याच्या अंगी असलेल्या कौशल्याचा वापर योग्य पद्धतीने ते करून घेत. अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन महाराजांनी अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री मोहिमेची सुरुवात केल्याचे दिसून येते. त्यांचे अष्टप्रधान मंडळ, मोहिमेत गनिमी काव्याचा वापर, कठोर निर्णय प्रक्रिया आणि पद्धतशीर नियोजन इत्यादी गुणांचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनात असल्याचे मत देखील त्यांनी प्रसंगी व्यक्त केले.
महाराजांनी सर्वसामान्य मावळ्यांकडून असामान्य कामे करून स्वराज्याला एक वेगळ्या उंचीवर नेऊन दाखवले. महाराजांनी आपल्या स्वराज्य निर्मितीसाठी जीवा महाले, तानाजी मालुसरे, येसाजी काकडे, शिवा काशिद यांसारखे जीवाला जीव देणारे मावळे यांची जुळवाजुळव करून त्यांना दिशा देण्याचे काम केले, जे व्यवस्थापनाचे सर्वोत्तम कार्य महाराजांनी केले आहे. यावरून महाराजांची व्यवस्थापनावरची उत्तम पकड दिसून येते.
आजच्या पिढीला छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी, राष्ट्रभक्ती, सर्वधर्मसमभाव व विज्ञानवादी विचारधारा कळून आजचे तरुण वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट प्रगती करू शकतील. प्रेरणा आणि उत्साह याचेच दुसरे नाव म्हणजे छत्रपती शिवराय असून महाराजांच्या चरित्रात ठायीठायी उत्तम मॅनेजमेंट पाहावायांस मिळते. तसेच आजच्या एकविसाव्या शतकातही आपल्याला महाराजांच्या चरित्रातून सुयोग्य दिशा व मार्गदर्शन मिळते, असे सांगत प्रा. पाटील यांनी महाराजांच्या काळातील स्वराज्याचे शासन, प्रशासन, निष्ठा, गनिमी कावा, धैर्य, प्रसंगावधान या सर्व गोष्टींचा महाराजांनी विविध प्रसंगात कसा उपयोग केला?, हे उदाहरणासह स्पष्ट केले. तब्बल दिड तासाच्या व्याख्यानात प्रा. रूपेश पाटील यांनी आपल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीने शिवकालीन प्रसंग कथन करून उपस्थित शिवप्रेमींची मने जिंकली.

सदर कार्यक्रमाची सुरुवात डॉ. चंद्रकांत कढरे व चमूने गायलेल्या महाराष्ट्र गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. एन. डी. भामरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. भूषण अहिरराव यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी बांधव व विद्यार्थी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ADVT – 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles