कफ सिरप प्रकरण : मृत्यूंचा आकडा २२ वर. ; श्रेसन फार्माच्या मालकाला अटक.

नागपूर : कफ सिरपच्या दुष्परिणामामुळे मृत्यू होणाऱ्या मुलांची संख्या वाढतच आहे. या प्रकरणातील बळींची संख्या सध्या २२ वर पोहोचली आहे. बुधवारी रात्री नागपुरात आणखी एका तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मध्य प्रदेश पोलिसांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) कोल्ड्रीफ औषधाची निर्मिती करणाऱ्या श्रेसन फार्मा कंपनीचे मालक रंगनाथन गोविंदन यांना चेन्नईहून अटक केली. तत्पूर्वी कंपनीचे कारखाने सील करण्यात आले आणि कांचीपूरम येथील कारखान्यातून संबंधित कागदपत्रे जप्त केली गेली.

यापूर्वी मध्य प्रदेश सरकारने या प्रकरणात दोन औषध निरीक्षक आणि अन्न व औषध प्रशासनाच्या उपसंचालकांना निलंबित केले होते. तसेच, मुलांसाठी कोल्ड्रीफ औषध लिहून देणाऱ्या डॉ. प्रवीण सोनी यालाही छिंदवाडा येथे अटक झाली आहे. त्यांचा जामीन अर्ज परासिया येथील न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव गुरुवारी दुपारी नागपुरात पोहोचले आणि विमानतळावरून थेट एम्समध्ये गेले. येथे छिंदवाडा जिल्ह्यातील दोन मुले दाखल असून, हेल्थ सिटी रुग्णालय आणि मेडिकल रुग्णालयालाही ते भेट देणार आहेत. देशातील औषध नियंत्रण करणाऱ्या सीडीएससीओने कोल्ड्रीफ, रेस्पिफ्रेश टीआर आणि रीलाइफ या तीन खोकल्याच्या औषधांचा भारतीय बाजारातून परत मागवण्याचा आणि उत्पादन थांबवण्याचा आदेश दिला आहे. यापैकी कोणतेही औषध निर्यात केलेले नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेला कळवण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles